

मुंबई : राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारताच आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यभर धाडी व जप्तीची विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश दिल्यानंतर अवघ्या तीन दिवसांत प्रशासनाने मोठी कारवाई करत भेसळखोर, प्रतिबंधित गुटखा विक्रेते आणि अस्वच्छ अन्न उत्पादकांविरोधात धडक मोहीम उघडली आहे.
२५ ते २७ मे या कालावधीत बृहन्मुंबई, कोकण, पुणे, नाशिक, अमरावती, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर विभागात राबविण्यात आलेल्या या मोहिमेत ३३ आरोपींना अटक करण्यात आली असून २७ आस्थापना सील केल्या. सुमारे २० लाख ५७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गुटखा, पानमसाला आणि तत्सम प्रतिबंधित पदार्थांच्या विक्रीप्रकरणी ५३ आस्थापनांची तपासणी केली. त्यापैकी ३४ ठिकाणी नियमबाह्य विक्री सुरू असल्याचे आढळले. याप्रकरणी २५ एफआयआर दाखल केले असून ५ वाहनेही जप्त करण्यात आली आहेत.
मुंबई विभागात १९ आस्थापनांवर कारवाई करून ती सील करण्यात आली असून १९ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
राज्यात २३ आस्थापनांवर कारवाई करत पॅकबंद पिण्याचे पाणी, दूध, नूडल्स, खाद्यतेल, मसाले, तूप, पनीर, खवा, फरसाण, आईस्क्रीम, बेसन आणि बेकारी पदार्थांसह सुमारे २८ लाख ७८ हजार रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. या पदार्थांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत.
आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितले की, ‘जनतेच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला किंवा आस्थापनाला कोणतीही सवलत दिली जाणार नाही. भेसळ, प्रतिबंधित पदार्थांची विक्री आणि असुरक्षित अन्न उत्पादनाविरोधातील कारवाई यापुढे अधिक कठोर आणि सातत्यपूर्ण असेल.