
यमुना एक्स्प्रेस वेवर गुरुवारी सकाळी झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून मृत पावलेल्यांपैकी चार जण पुण्याचे रहिवासी आहेत, तर एक कर्नाटकचा आहे. मृतांमध्ये चार महिला आहेत. पहाटे ५ वाजता जेवर टोलनाक्यापासून ४० किमी अंतरावर हा अपघात झाला. अपघातानंतर सर्वांना जखमी अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आले असता पाच जणांना मृत घोषित करण्यात आले, तर दोघांवर कैलाश रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृतांमधील चार प्रवासी महाराष्ट्रातील असून ते ६० वर्षे वयोगटातील आहेत. चालकाला डुलकी लागल्याने हा अपघात झाला, असा पोलिसांचा अंदाज आहे.
बीड-अहमदनगर मार्गावर
अपघातात चौघांचा मृत्यू
अहमदनगर : बीड - अहमदनगर रस्त्यावर बुधवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास धामणगाव जवळील वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार खडड्यात कोसळून झालेल्या भीषण अपघातात बीड शहरातील प्रसिद्ध व्यावसायिक टेकवाणी कुटुंबातील तीन भाऊ व एक तरूण असे चौघे जागीच ठार झाले. तर एक वीस वर्षीय मुलगा मात्र बालंबाल बचावला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या अपघातात शंकर शेठ टेकवाणी (५५), त्यांचे बंधू सुनील टेकवाणी (५०), शंकर टेकवाणी (४८ ), तर पुतण्या लखन महेश टेकवणी (३०) या चौघांचा जागीच मृत्यू झाला. शंकर टेकवणी यांचा मुलगा निरज (२० वर्षे) हा मात्र या भीषण अपघातात थोडक्यात बचावला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.