
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने दोन दिवसापूर्वी शासनाकडे पदस्पर्श दर्शनाचा प्रस्ताव दिला होता. मंगळवारी याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमवेत मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर आणि मंदिर समितीचे सदस्य यांच्यात बैठक झाली. यात पुन्हा पदस्पर्श दर्शन सुरू करण्याचा निर्णय झाला आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर भाविकांना श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेचे पदस्पर्श दर्शन मिळणार आहे. कोरोना संकटामुळे गेल्या दोन वर्षांपासून पदस्पर्श दर्शन बंद होते.
गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे अनेक गोष्टींवर मर्यादा आणल्या होत्या. दोन वर्षे वारीही बसद्वारेच पार पडली आहे. यावरून अनेकदा वारकऱ्यांनी आंदोलनही केले. मात्र, कोरोनामुळे अनेक सण, यात्रा उत्सव रद्द करण्यात आले होते. त्यामुळे विठ्ठल दर्शनावरही मर्यादा आल्या होत्या.
कोरोनामुळे लागू होते निर्बंध
पदस्पर्शाने कोरोना वाढण्याची भीती पसरली होती. त्यामुळे काही काळ पदस्पर्श दर्शन भक्तांसाठी बंद करण्यात आले होते. काही काळ विठोबाही आपल्या भक्तांच्या भक्तीला पोरका झाला होता. पंढरपूरला आपल्या धार्मिक इतिहासात दक्षिण काशीचे स्थान आहे. सावळ्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी रोज लाखो नागरिक पंढरीत दाखल होतात आणि आपल्या लाडक्या विठोबाचे दर्शन घेतात. पंढरपूर आणि शिर्डी या दोन्ही धार्मिक ठिकाणी देशभरातून भाविकांची रिघ वर्षभर सुरू असते. कोरोनामुळे अनेक धार्मिक स्थळेही बंद करण्यात आली होती. काही मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पूजा पार पडत असे. यंदाची वारीही मर्यादित वारकऱ्यांच्या उपस्थितीत बसने पार पडली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही कठोर निर्णय प्रशासनाला आणि मंदिर समित्यांना घ्यावे लागले होते.