
कराड : कराड तालुक्यातील म्होप्रे गावात चक्क गांजाची शेती केल्याचा प्रकार उघडकीस आला असून कराड पोलिसांनी कारवाई करत १२ किलो गांजा जप्त करत एकास अटक केली आहे. याप्रकरणी सोमनाथ पांडुरंग जाधव (रा.म्होप्रे, ता.कराड) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येऊन त्याला अटक करण्यात आली आहे. म्होप्रे येथे एका शेतात गांजाची लागवड केल्याची माहिती काही लोकांच्याकडून कराड पोलिसांना मिळाली होती.त्यानुसार पोलिसांनी खात्री केल्यानंतर पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकून तब्बल १२ किलो गांजा हस्तगत केला.म्होप्रे येथील सोमनाथ जाधव यांनी गावातील बेघर वसाहतीशेजारील त्यांच्या मालकीच्या शेतात गांजाची लागवड केली होती. याची माहिती काही लोकांनी पोलिसांना दिल्यानंतर कराड ग्रामीणचे पोलीसांच्या पथकाने म्होप्रे येथे जाऊन संशयित सोमनाथ जाधव याच्या शेतात गांजा लागवड केलेल्या ठिकाणी तपासणी केली. तेथून तब्बल १२ किलो वजनाची गांजाची झाडे हस्तगत केली. जाधव याच्या घराची झडती घेतली असता घरातही ८२२ ग्रॅम गांजा मिळून आला. पोलिसांनी या छाप्यात तब्बल एक लाख २६ हजार ९२० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.