
पुढील दोन दिवस राज्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मराठवाडा, विदर्भात गेल्या आठवड्यात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. नाशिक जिल्ह्यात संततधार पावसामुळे नद्या दुथडी भरून वाहत आहेत. मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्रात मात्र गेल्या तीन-चार दिवसांत पावसानं उसंत घेतली होती; मात्र आता पाऊस पुन्हा सक्रिय होणार आहे.
पुणे हवामान विभागाचे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी याबाबतचं ट्विट केलं आहे. पुण्यासह सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, उस्मानाबाद, बीड, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली, अमरावती, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या १८ जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. या ठिकाणी बुधवार आणि गुरुवार विजांच्या कडकडाटासह मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. शुक्रवारपासून पावसाचा जोर ओसरेल, असा अंदाज आहे.
देशात २९ आणि ३० जुलै रोजी आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा राज्यांत तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.