पोलिसांच्या गलथान कारभारावर हायकोर्टाचे ताशेरे, केस डायरी हाताळण्यात पोलिसांची हयगय

गुन्ह्याची नोंद असलेल्या केस डायरी योग्यरित्या हााळण्यात हयगय करणाऱ्या पोलिसांना उच्च न्यायालयाने चांगलेच धारेवर धरले.
पोलिसांच्या गलथान कारभारावर हायकोर्टाचे ताशेरे, केस डायरी हाताळण्यात पोलिसांची हयगय

मुंबई : गुन्ह्याची नोंद असलेल्या केस डायरी योग्यरित्या हााळण्यात हयगय करणाऱ्या पोलिसांना उच्च न्यायालयाने चांगलेच धारेवर धरले. न्यायालयाने वारंवार आदेश दिले. त्या अनुसंघाने पोलीस महासंचालकांनी (डीजीपी) परिपत्रकही जारी केले. त्यानंतरही केस डायरीमध्ये सुसूत्रता आलेली नाही. पोलिसांना डीजीपींच्या परिपत्रकाचे भान नाही का? वरिष्ठांचे निर्देश पोलीस ठाण्यात पोहोचत नाहीत का? असे संतप्त सवाल न्यायमूर्ती अजय गडकरी अणि न्यायमूर्ती डॉ. निला गोखले यांच्या खंडपीठाने उपस्थित केले.

गुन्हा रद्द करण्यासंबंधित याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठाने पोलिसांच्या हलगर्जीपणावर कडक ताशेरे ओढले. फौजदारी दंडसंहितेच्या कलम १७२ (१-ब) मधील तरतुदीचे पूर्णपणे उल्लंघन केल्याचे हे आणखी एक उत्कृष्ट उदाहरण आहे. या प्रकरणातील केस डायरीची पानेही क्रमाने लावलेली नाहीत. डायरीत पूर्णपणे विस्कळीतपणा आहे. कुठल्याही गुन्ह्याच्या तपासात दैनंदिन केस डायरी योग्यरीत्या ठेवणे बंधनकारक आहे; मात्र या तरतुदीशी आपले काहीच देणेघेणे नसल्यासारखे पोलीस वागताहेत. अशा शब्दात संताप व्यक्त करत खेरवाडी पोलीस ठाण्याची केस डायरी पुढील कारवाईसाठी डीजीपींकडे पाठवा व त्यावर डीजीपींनी २८ जूनला सविस्तर अहवाल द्यावा, असेही आदेश न्यायालयाने दिले.

राज्यभर तरतुदींचे काटेकोर पालन करा

जानेवारीत न्यायालयाच्या आदेशानंतर डीजीपींनी परिपत्रक काढले. मात्र त्याची अंमलबजावणी योग्यरीत्या होत नाही, अशी नाराजी न्यायालयाने व्यक्त केली आणि राज्यातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये केस डायरीच्या तरतुदींची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश डीजीपींना दिले.

logo
marathi.freepressjournal.in