कोविशील्डच्या दोन डोसमधील कालावधी पुन्हा घटणार नॅशनल टेक्निकल ग्रूपची सरकारला शिफारस

कोविशील्डच्या दोन डोसमधील 
कालावधी पुन्हा घटणार
नॅशनल टेक्निकल ग्रूपची सरकारला शिफारस

कोरोना विरोधात कोविशील्डचा डोस घेतलेल्या नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी असून पहिल्या डोसनंतर दुसऱ्या डोससाठी आता चार महिने वाट पाहावी लागणार नाही. कारण नॅशनल टेक्निकल अॅडव्हायझरी ग्रूप ऑन इम्युनायझेशनने (एनटीएजीआय) कोविशील्ड लसीकरणाच्या पहिल्या आणि दुसऱ्या डोसमधील अंतर कमी करण्याची शिफारस केंद्राला केली आहे.

शिफारसीनुसार, कोविशील्डचा दुसरा डोस ८ ते १६ आठवड्यांदरम्यान देण्याचा सल्ला देण्यात आला आहे. देशातील कोरोना रुग्णांची घटती संख्या आणि लसीकरणाच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर ही शिफारस करण्यात आली आहे.

सध्या, ‘एनटीएजीआय’ने कोविशील्डच्या दोन डोसमधील अंतर कमी करण्याच्या प्रस्ताव प्रत्यक्षात अंमलात येणे बाकी असून, सल्लागार गटाचा प्रस्ताव जागतिक स्तरावर करण्यात आलेल्या अलीकडील काही वैज्ञानिक अभ्यासांच्या आधारे तयार करण्यात आला आहे. दरम्यान, सरकारने या प्रस्तावाला मान्यता दिल्यास लाभार्थ्यांना कोविशील्डचा दुसरा डोस जलद मिळण्याचा मार्ग मोकळा होईल, असे सांगण्यात आले आहे.

सध्या देशात ६० ते ७० दशलक्ष लोकांना लसीचा दुसरा डोस मिळालेला नाही. यापूर्वी १३ मे २०२१ रोजी केंद्र सरकारने कोविशील्डच्या पहिल्या आणि दुसऱ्या डोसमधील अंतर ६ ते ८ आठवड्यांवरून १२ ते १६ आठवड्यांपर्यंत वाढवले होते. याबाबतही ‘एनटीएजीआय’ने आरोग्य मंत्रालयाला प्रस्ताव दिला होता. सध्या लसीकरण धोरणांतर्गत, कोविडशील्डच्या पहिल्या डोसनंतर १२ ते १६ आठवड्यांनंतर दुसरा डोस दिला जात असून, ‘एनटीएजीआय’ने भारत बायोटेकच्या कोवॅक्सिनच्या दोन डोसमधील २८ दिवसांच्या कालावधीत बदल केलेला नाही.

--

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in