राज्यात १५ दिवस उष्णतेची लाट; पुणे वेधशाळेचा अंदाज

विदर्भात सूर्य आग ओकत आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यांत तापमानाचा पारा ४२ ते ४३ अंश सेल्सिअसचा पल्ला गाठत आहे, तर मराठवाड्याच्या अनेक भागांत तापमान ४० अंशावर गेले आहे. पुणे, नाशिक, जळगाव येथेही तापमान ४० च्यावर गेलेले दिसत आहे.
राज्यात १५ दिवस उष्णतेची लाट; पुणे वेधशाळेचा अंदाज
Published on

पुणे : राज्यात विविध ठिकाणी तापमानाचा पारा चढला आहे. येते १५ दिवस राज्याच्या अनेक जिल्ह्यांत उष्णतेची लाट येणार आहे, असा अंदाज पुणे वेधशाळेने व्यक्त केला आहे. पुढील काही दिवसांत मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तापमानात मोठी वाढ होईल, असा अंदाज वेधशाळेने व्यक्त केला.

विदर्भात सूर्य आग ओकत आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यांत तापमानाचा पारा ४२ ते ४३ अंश सेल्सिअसचा पल्ला गाठत आहे, तर मराठवाड्याच्या अनेक भागांत तापमान ४० अंशावर गेले आहे. पुणे, नाशिक, जळगाव येथेही तापमान ४० च्यावर गेलेले दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून उष्णतेची लाट सुरू झाली आहे. येणाऱ्या दिवसांमध्ये तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याचे होसाळीकर म्हणाले.

सध्या निवडणूक सुरू असल्याने मतदार, पक्षाचे कार्यकर्ते व नेते आदींनी त्यांची काळजी घेण्याची आवश्यकता आहे. सकाळी १२ ते दुपार ३ वाजेपर्यंत अतिमहत्त्वाचे नसेल तर बाहेर पडू नका, असा सल्ला पुणे वेधशाळेचे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी दिला आहे.

पाच दिवस पावसाची शक्यता

येते दोन दिवस राज्यात सर्वत्र हवामान कोरडे राहील. पुढील पाच दिवस कमाल तापमानात विशेष बदल होणार नाही. पाच ते नऊ एप्रिलदरम्यान मध्य महाराष्ट्रात, ८ एप्रिल मराठवाड्यात ६ ते ९ एप्रिल विदर्भात, ९ एप्रिलला कोकण, गोव्यात हलक्‍या स्वरूपाच्या पावसाची शक्‍यता आहे. ७ एप्रिलला मध्य महाराष्ट्रात आणि विदर्भात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे, असाही अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. पुण्यात पुढील सहा दिवस आकाश मुख्यतः निरभ्र राहून किंवा संध्याकाळी आकाश अंशतः ढगाळ राहील. ९ तारखेला आकाश अंशतः ढगाळ राहून हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

logo
marathi.freepressjournal.in