आशिष शेलार सिल्व्हर ओकवर; चर्चांना उधाण

या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
आशिष शेलार सिल्व्हर ओकवर; चर्चांना उधाण
Published on

मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेटत घेतल्याची माहिती समोर आली आहे. या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. पवारांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी ही भेट झाल्याचे सांगितले जात आहे. या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहे. एकीकडे शरद पवार हे आगामी लोकसभा निवडणुकीत विरोधकांना एकजुट करुन त्यांची मोठ बांधण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. तर दुसरीकडे आशिष शेलार यांनी त्यांची घेतलेली भेट ही चर्चेचे विषय ठरत आहे. मात्र, ही राजकीय भेट नसल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

या भेटीत कोणत्याही राजकीय विषयावर चर्चा झाली नसल्याचे सांगितले जात आहे. आगामी विश्वचष, वानखेडे मैदानावर होणारे सामने, या आणि अशा अनेक मुद्यांवर या भेटीत चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लक्षवेधी घडामोडी घडत आहेत. राज्याचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे भाजपसोबत हातमिळवणी करुन सरकार स्थापन करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. त्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा दिलेला राजीनामा आणि त्यानंतर कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर मागे घेतलेला राजीनाम्याचा निर्णय. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची ईडीकडून सुरु असलेली चौकशी. तसेच आताच राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे महत्वाचे नेते अनिल देशमुख यांनी केलेला गौप्यस्फोट या आणि अशा अनेक घटना राष्ट्रवादीत घडल्या आहेत.

आशिष शेलार यांनी घेतलेली पवांरांची भेट आणि या घटनांचा काही संबंध आहे का? पडद्यामागे काही घडतंय का काय? अशा चर्चांना सध्या उधाण आले आहे. मात्र ही भेट पुर्णपणे अराजकीय असल्याचे सांगण्यात येत आहे.

logo
marathi.freepressjournal.in