मुंबई-गोवा महामार्गावरील एसटीच्या सुरक्षित प्रवासासाठी दुरुस्ती पथकांना सूचना

एसटी महामंडळाने गणेशोत्सवनिमित्त नियमित गाड्यांसोबतच ३ हजारहून जादा गाड्या सोडल्या आहेत. त्याला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद
मुंबई-गोवा महामार्गावरील एसटीच्या सुरक्षित प्रवासासाठी दुरुस्ती पथकांना सूचना

मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांची दृश्ये दररोज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अशातच यंदा एसटी महामंडळाकडून गणेशोत्सवासाठी सोडण्यात येणाऱ्या बसगाड्यांचा प्रवास खडतर होऊन नये यासाठी एसटी महामंडळाने चांगलीच कंबर कसली आहे. खराब रस्त्यांमुळे टायर पंक्चर होण्याची, तसेच बस बिघाडण्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता नजरेसमोर ठेवत प्रशासनाने मार्गावरील दुरुस्ती पथकांना सज्ज राहण्याच्या सूचना केल्या आहेत. याशिवाय आगार आणि दुरुस्ती पथकांसाठी नेहमीपेक्षा प्रत्येकी किमान १० अतिरिक्त टायर ठेवण्याच्या सूचना महामंडळाकडून देण्यात आल्या आहेत.

एसटी महामंडळाने गणेशोत्सवनिमित्त नियमित गाड्यांसोबतच ३ हजारहून जादा गाड्या सोडल्या आहेत. त्याला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र मुंबई-गोवा महामार्गाची दुरावस्था झाली असून एसटीने जाणाऱ्या प्रवाशांना बराच त्रास सहन करावा लागण्याची शक्यता आहे. प्रवासादरम्यान प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून एसटी महामंडळाने खबरदारी म्हणून काही उपाययोजना केल्या आहेत. याबाबतच्या सूचना आगार प्रमुख, विभाग नियंत्रक, चालक-वाहक, बस दुरुस्ती पथकांना दिल्या आहेत. यासोबत जादा प्रवासी वाहतूक करताना अतिवृष्टीमुळे कशेडी घाटातून सुरक्षितरित्या एसटी चालवावी असेही चालकांना बजावण्यात आले आहेत. तसेच वाहतूककोंडी टाळण्यासाठी रायगड आणि रत्नागिरी विभागातील एसटीची गस्ती पथके २६ ते ३१ ऑगस्ट आणि ५ ते १० सप्टेंबर या काळात दोन्ही बाजूला २४ तास तैनात असणार आहेत. दरम्यान, गणेशोत्सवाच्या काळात एसटी गाड्यांमध्ये होणारे बिघाड लक्षात घेऊन प्रवाशांचा खोळंबा होऊ नये यासाठी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर कुर्ला-पनवेल पट्ट्यात कोकणभवन येथे, रामवाडी-कोलाडदरम्यान वाकणफाटा येथे, कोलाड-पोलादपूरमधील लोणेरेफाटा, पोलादपूर-चिपळूण दरम्यान कशेडी येथे, चिपळूण-राजापूर दरम्यान संगमेश्वर आणि राजापूर ते सावंतवाडी दरम्यान तरळा येथे दुरुस्ती पथके तैनात करण्यात येणार असल्याचे एसटी महामंडळाकडून सांगण्यात आले.

महामंडळाच्या काही महत्त्वपूर्ण सूचना

- एसटीसाठी कमी किलोमीटर धावलेले अथवा नवीन टायर वापरण्यात यावेत.

- मार्गावरील आगार, दुरुस्ती पथकांनी नेहमीपेक्षा प्रत्येकी किमान दहा अतिरिक्त टायर ठेवावेत.

- ट्रेलर, अन्य जड वाहने आणि वाळूचे ट्रक यांना गणेशोत्सव काळात वाहतूक करण्यास मनाई

- तपासणीदरम्यान मद्यपान केल्याचे आढळताच चालकाला तात्काळ निलंबित करण्यात येणार

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in