जलयुक्त नागपूर; एका महिलेचा मृत्यू , ४०० नागरिकांचे स्थलांतर

तीन फेऱ्या मारून त्या सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले
जलयुक्त नागपूर; एका महिलेचा मृत्यू , ४०० नागरिकांचे स्थलांतर

नागपूर : नागपुरात शुक्रवारी मध्यरात्रीपासून झालेल्या ढगफुटीने शहरात हाहाकार माजला. जलयुक्त शिवाय योजनेचे प्रणेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघातील शहर असलेले नागपूर शहरच जलयुक्त झाल्याचे शनिवारी पहायला मिळाले. अवघ्या चार तासांत झालेल्या १०६ मिलीमीटर पावसाने शहराच्या अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. पंचशील चौक परिसरातील अनेक रुग्णालयांमध्ये पाणी शिरले आहे. शंकरनगरातील वोक‌्हार्ट रुग्णालयातील ऑक्सिजन पुरवठा युनिटही पाण्याखाली गेले आहे. यात एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे. पुरात अडकलेल्या मूकबधिर शाळेतील ४० विद्यार्थ्यांसह १८० जणांना वाचवण्यात आले आहे. शहरातील ४०० नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. बचावकार्यासाठी राज्य व राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या चार तुकड्या कार्यरत असून अंबाझरी भागात लष्कराच्या दोन तुकड्या पोहोचल्या आहेत.

शुक्रवारी मध्यरात्रीपासून शहरात मुसळधार पाऊस झाला. नागपूर विमानतळावर सकाळी ५.३० वाजेपर्यंत १०६ मिमी पाऊस झाल्याची नोंद हवामान खात्याने केली आहे. मुसळधार पावसामुळे अनेक रस्ते आणि रहिवासी भागात पाणी साचले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. दरम्यान, नागपूर वेधशाळेने सांगितले की, नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांतील अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. वर्धा, चंद्रपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांच्या काही भागांत अनेक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. अमरावती, यवतमाळ आणि गडचिरोली येथे काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे विभागीय प्रशासनाने सतर्कतेचे आदेश दिले आहेत.

नागपूरचे आमदार असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकाळी एक्सवर सांगितले की, शहरातील पावसाच्या परिस्थितीवर ते सतत लक्ष ठेवून आहेत. मुसळधार पावसामुळे अंबाझरी तलाव ओसंडून वाहत आहे. त्यामुळे नाग नदीला पूर आला असून सखल भागाला त्याचा मोठा फटका बसला आहे. शहरातील इतर भागांनाही याचा फटका बसला आहे.

फडणवीस यांच्या कार्यालयाने सांगितले की, उपमुख्यमंत्र्यांनी नागपूरचे जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्तांना काही ठिकाणी अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी अनेक पथके त्वरित कार्यान्वित करण्याचे निर्देश दिले आहेत.’’

१४ जनावरांचा मृत्यू

नागपूर शहरातील पूरसदृश स्थितीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाला सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. शहरासह जिल्ह्यात झालेल्या पावसात १४ जनावरांचा मृत्यू झाला आहे. ‘‘कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये. प्रशासन पूर्णपणे जागरूक आहे. कुठलीही अडचण असेल तर त्यांनी प्रशासनाशी संपर्क साधावा,’’ असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

बसमधील २५ प्रवाशांची सुटका

यवतमाळ येथून २५ प्रवाशांना घेऊन नागपुरातील पंचशील चौकात पहाटे साडेचार वाजता. आलेली एक बस पाण्यात अडकून पडली. सीटपर्यंत पाणी पोहचल्याने भयभीत झालेल्या प्रवाशांना दीड तासांच्या थरारानंतर एसडीआरएफच्या बोटने या प्रवाशांची सुखरूप सुटका केली. एसडीआरएफचे सहायक कमांडन्ट कृष्णा सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक अरुण उसेंडी यांच्या नेतृत्वात सहा जणांच्या टीमने हे ऑपरेशन यशस्वी केले. बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी एसडीआरएफचे पथक दोराच्या साहाय्याने बसपर्यंत पोहोचले. बसमध्ये बसलेले सर्व प्रवासी घाबरलेले होते. त्यांना धीर देण्यात आला. एकावेळी ८ प्रवाशांना बोटमध्ये बसविण्यात आले. जीव वाचविण्यासाठी आरडाओरड सुरू झाली. एसडीआरएफच्या पथकाने सर्वांना शांत केले. तीन फेऱ्या मारून त्या सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले, असे अरुण उसेंडी यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in