आरक्षणासाठी जरांगे यांची सरकारला १३ जुलैपर्यंत मुदत

मराठा समाजाला सगेसोयऱ्यांसह आरक्षण द्यावे, या मागणीवर मराठा आंदोलन नेते मनोज जरांगे-पाटील ठाम असून त्यांनी राज्य सरकारला आरक्षण देण्यासाठी १३ जुलैपर्यंतची मुदत दिली आहे.
आरक्षणासाठी जरांगे यांची सरकारला १३ जुलैपर्यंत मुदत

हिंगोली: मराठा समाजाला सगेसोयऱ्यांसह आरक्षण द्यावे, या मागणीवर मराठा आंदोलन नेते मनोज जरांगे-पाटील ठाम असून त्यांनी राज्य सरकारला आरक्षण देण्यासाठी १३ जुलैपर्यंतची मुदत दिली आहे. जरांगे यांनी राज्यात शनिवारपासून शांतता रॅली सुरू केली असून त्याची सुरुवात हिंगोलीतून करण्यात आली. शांतता रॅली १३ जुलैपर्यंत सुरू राहणार आहे.

मराठा समाजाला संबोधित करताना मनोज जरांगे यांना अश्रू अनावर झाले. समाजाला आपण मायबाप मानले आहे, मराठा समाजच आपल्यासाठी सर्वकाही आहे, आपण समाजासाठी लढत आहोत, समाज मोठा होण्यासाठी तुम्ही सर्वांनी पाठीशी राहा, सरकारने आपल्याला उघडे पाडावयाचे ठरविले आहे. आपल्याला उघडे पाडू नका, असे भावनिक आवाहन जरांगे यांनी समाजाला हात जोडून केले.

मराठा समाजाला मोठे करण्यासाठी निघालो आहे. कारण माझ्या समाजाने खूप वेदना सहन केल्या आहेत. माझ्या मायबाप समाजाचे विद्यार्थी शिकून खूप मोठे व्हावेत, असे स्वप्न बघितले आहे. पाण आरक्षणाच्या अडचणीमुळे आपल्या समाजातील तरुण मोठे होत नाहीत, असेही ते म्हणाले.

मनोज जरांगे पुढे म्हणाले, "आता त्यांनी आरक्षण ठरवलं आहे की, मला उघडं पाडायचं, मात्र मनोज जरांगे जर लांब गेला तर मराठा समाजाला एवढा निष्ठावान कोणीही मिळू शकणार नाही. त्यामुळे मला बदनाम करायचे ठरवले आहे. पण तुम्ही मला उघडे पडू देऊ नका. मला तुमच्या पाठबळाची आणि आशीर्वादाची गरज आहे", असे म्हणत मनोज जरांगे यांना भाषण करताना अश्रू अनावर झाले.

logo
marathi.freepressjournal.in