
काही वर्षांपूर्वी बारामतीत आलेल्या नरेंद्र मोदी यांनी आपण शरद पवार यांचे बोट धरून राजकारणात आल्याचे म्हटले होते. आज आपण मोदी यांच्यावर टीका करत आहात, याबाबत विचारले असता, “माझेच बोट देशाला एवढे महाग पडेल, असे वाटले नव्हते,” अशी कोपरखळी शरद पवार यांनी लगावली.
खोट्या आरोपात नेत्यांना अडकवले
राज्यातील गृहमंत्रीसारख्या महत्त्वाच्या पदावर राहिलेल्या अनिल देशमुख यांच्या घरी ‘ईडी’च्या ५०, सीबीआयच्या ४० आणि आयकर विभागाकडून २० अशा एकूण ११० धाडी टाकण्यात आल्या. विशेष म्हणजे, पहिल्या आरोपपत्रात १०० कोटींचा घोटाळा, दुसऱ्या आरोपपत्रात तो चार कोटी सात लाख तर शेवटच्या आरोपपत्रात तो एक कोटी ७१ लाख झाला आहे. याचप्रकारे नवाब मलिक आणि संजय राऊत यांनाही खोट्या आरोपात अडकवले असल्याचा गंभीर आरोप पवार यांनी केला.