विजय पाठक/जळगाव
राज्यातील जनता ही विविध समस्यांनी ग्रासली आहे, त्याकडे लक्ष देण्यास आताच्या महायुती सरकारला वेळ नाही, त्यामुळे जनतेच्या कल्याणासाठी आगामी काळात महाविकास आघाडीचे सरकार येऊ दे, असे साकडे माजी मंत्री, ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आपल्या निवासस्थानी गणरायाच्या स्थापनेनंतर गणरायाला घातले.
राष्ट्रवादीचा राजीनामा दिल्यानंतर भाजपच्या वाटेवर एकनाथ खडसे असून दिल्लीत भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा व केंद्रीय ग्रुहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केल्याचा दावा खडसे यांनी केला त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्या विरोधामुळे आपला प्रवेश जाहीर करण्यात आला नसल्याचा आरोप देखील खडसे यांनी केला होता. यावर गिरीश महाजन यांनी अध्यक्ष जे. पी. नड्डा व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी प्रवेश दिला असेल तर त्यांना नाही म्हणणारे आम्ही कोण? असा सवाल करत खडसे लोकसभा निवडणुकीत सून रक्षा खडसे यांच्यासाठी भाजपचा प्रचार केल्याचे सांगतात तर आता विधानसभा निवडणुकीसाठी कन्या रोहिणीला आमदार करण्यासाठी ते राष्ट्रवादीचे समर्थन करत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. खडसे हे दोन्ही दगडांवर पाय रोवून आहेत. त्यांचा राजीनामा शरद पवार का मंजूर करत नाही? खडसे राष्ट्रवादीकडून आमदार झालेले आहेत त्या आमदारकीचा राजीनामा दिला नसल्याचे महाजन यांनी म्हटले आहे.
भाजपकडून पक्ष प्रवेश मिळत नसल्याने एकनाथ खडसे हे सध्या अस्वस्थ असल्याचे जाणवते. या अस्वस्थतेतून गणेश स्थापनेचा मुहूर्त साधत आपल्या मनातील अस्वस्थता खडसेंकडून बाहेर पडली. त्यांनी सरकार जावे असे वाटते असे सांगत भाजपबद्दल आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली. आता या नाराजीनंतर खडसेंचा भाजप प्रवेश होणार काय? यावर प्रश्नचिन्ह लागले आहे.
जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसने एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादीत घेण्यास विरोध केला होता, तसे शरद पवार यांना न घेण्याबाबत विनंती देखील केली होती. या प्रवेशाने जिल्हा स्तरावर नाराजी व्यक्त केली गेली होती. शरद पवार यांनी खडसेंमुळे उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादीचा प्रभाव वाढेल या अपेक्षेने प्रवेश दिला. मात्र प्रत्यक्षात तसे काही घडले नाही.
मागील काही महिन्यांपासून महायुती सरकारचा अनुभव चांगला नाही. राज्यात महायुतीचे सरकार आल्यापासून फोडाफोडीचे राजकारण सुरू आहे. सूडबुद्धीने ईडी, सीबीआय कारवाई करत आहेत. जनतेची कामे होतांना दिसत नाही. लाडकी बहीण योजनेत ४६ हजार कोटी द्यावे लागत आहेत, हे देण्यास हरकत नाही पण याच पैशातून धरण रस्ते निर्मितीसाठी वापरता आले असते. - एकनाथ खडसे