छत्रपती संभाजीनगर/पनवेल : छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याचे नाव पूर्वी औरंगाबाद होते. या जिल्ह्याला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव दिले जावे, अशी मागणी सर्वप्रथम शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केली होती. बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न आमच्या महायुतीच्या सरकारने पूर्ण केले. राज्यात अडीच वर्षे महाविकास आघाडीचे सरकार होते. उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. मात्र, ते बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करू शकले नाहीत. मात्र महायुतीचे सरकार आल्यावर अवघ्या काही महिन्यांत आम्ही बाळासाहेबांची ती अपूर्ण राहिलेली इच्छा पूर्ण केली, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
ते म्हणाले की, “छत्रपती संभाजीनगरमध्ये पाणीपुरवठा करण्यासाठी महायुती सरकारने १६ कोटी रुपये दिले होते. मात्र, महाविकास आघाडीने ही योजना थांबवली. आता युतीच्या काळात ही योजना पुन्हा सुरू झाली आहे. मात्र, त्याचा खर्च वाढला आहे. आता त्यासाठी केंद्र सरकार पुन्हा ७०० कोटी रुपये देणार आहे, अशी माहितीही नरेंद्र मोदी यांनी दिली.
काँग्रेस नेहमीच आरक्षणाच्या विरोधात राहिली आहे. देशाचा विकास त्यांना नेहमीच खुपत आला आहे. समाजांमध्ये फूट पाडणे आणि सत्ता काबीज करणे, हेच त्यांचे आजवरचे धोरण राहिले आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गांमधील समाजांना फोडण्याचे षडयंत्र काँग्रेसने रचले आहे. परंतु, आम्ही ते यशस्वी होऊ देणार नाही. गेल्या १० वर्षांपासून देशाला ओबीसी पंतप्रधान लाभला आहे. मात्र हेच काँग्रेसला खुपत आहे. काँग्रेसचे नेते परदेशांमध्ये जातात आणि खुलेआम घोषणा देतात की, आम्ही आरक्षण संपवून टाकू. आता ते महाविकास आघाडीतील पक्षांसह महाराष्ट्रातील छोट्या-छोट्या जातींमध्ये फूट पाडण्याचे काम करत आहेत. जेणेकरून त्या छोट्या जातींची, समुदायांची राजकीय शक्ती कमी व्हावी आणि ठराविक लोकांनाच सत्तेचा मलिदा मिळावा,” अशी टीकाही त्यांनी काँग्रेसवर केली.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे रण आता चांगलेच तापले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शहा हे भाजपचे दिग्गज नेते सध्या महाराष्ट्रात तळ ठोकून आहेत. महाराष्ट्रातील विविध मतदारसंघांत या नेत्यांच्या जाहीर सभा होत आहेत. गुरुवारी नरेंद्र मोदी यांनी दिवसभरात छत्रपती संभाजीनगर, पनवेल आणि मुंबई तीन सभा घेतल्या. या सभांमधून त्यांनी महाविकास आघाडीतील घटक पक्षांवर घणाघाती टीका केली. तसेच महायुतीच्या कामांचा उल्लेखही त्यांनी या सभांमधून केला.
काँग्रेस आरक्षणाच्या विरोधातच
सरकारमध्ये येण्यासाठी काँग्रेस विकास कामावर नाही, तर भेदभाव वाढवण्यावर विश्वास ठेवत आहे. त्यामुळे काँग्रेस कायमच आरक्षणाचा विरोध करत आली आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर काँग्रेसचा खरा विचार काय? यावर आज चर्चा सुरू आहे. काँग्रेस आरक्षणाला विरोध करत आली आहे. आजही तेच काँग्रेसचे धोरण आहे, असे टीकास्त्रही मोदींनी सोडले.
पनवेलमध्ये मोठा रोजगार निर्माण होणार
रायगड येथे डेटा आणि आर्टिफिशल इंटेलिजन्सचे मोठे क्षेत्र तयार होणार आहे. पनवेल, रायगड आणि हे संपूर्ण क्षेत्र भविष्याच्या संभावनांचे मोठे सेंटर बनणार आहे. इथे मोठा रोजगार निर्माण होणार आहे. पनवेल, रायगडचे पूर्ण क्षेत्र समुद्री संपदेने संपन्न आहे. आपले सरकार कोस्टल ईकोसिस्टिमसाठी मोठे कार्य करत आहे. हजारो, कोट्यवधी रुपयांची मदत मच्छीमारांना देण्यात आली आहे. कोकणात तीन नवी बंदरे बांधण्यात येणार आहेत, असेही मोदींनी पनवेलमधील सभेत सांगितले.