मोठी बातमी! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर; दुबार मतदान रोखण्यासाठीही आणलं खास 'टूल'

दीर्घकाळापासून प्रतीक्षा असलेल्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत राज्य निवडणूक आयोगाने मोठी घोषणा केली आहे. राज्यातील २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. दुबार नोंद असलेल्या मतदारांची अडचण दूर करण्यासाठी निवडणूक आयोगाने एक विशेष टूल विकसित केले आहे.
मोठी बातमी! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर; दुबार मतदान रोखण्यासाठीही आणलं खास 'टूल'
Published on

दीर्घकाळापासून प्रतीक्षा असलेल्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत राज्य निवडणूक आयोगाने मोठी घोषणा केली आहे. राज्यातील २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यासाठी २ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. तर, ३ डिसेंबर रोजी मतमोजणी अर्थात निकाल जाहीर होईल. राज्य निवडणूक आयोगाने आज (दि.४) दुपारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत याबाबतची घोषणा केली.

राज्य निवडणूक आयोगामार्फत राज्यातील २४६ नगरपरिषदा व ४२ नगरपंचायतींसाठी सार्वत्रिक निवडणुका घेतल्या जाणार आहेत. यामधून ६८५९ सदस्य आणि २८८ अध्यक्ष यांची निवड होईल. राज्यातील २३६ नगरपरिषदांची मुदत यापूर्वीच संपली आहे. याशिवाय, १० नवनिर्मित नगरपरिषदांसाठीही निवडणूक होणार आहे. तर, एकूण १४७ नगरपंचायतीपैकी ४२ नगरपंचायतींसाठी निवडणूक होणार आहे. ३१ ऑक्टोबरला प्रसिद्ध झालेल्या अंतिम मतदार यादीनुसार मतदान होणार असून यावेळी एकूण १ कोटी ७ लाख ३ हजार ५७६ मतदार असतील. यामध्ये ५३ लाख २२ हजार ८७० महिला मतदार असतील. मतदान केंद्रनिहाय याद्या ७ नोव्हेंबरला प्रकाशित होतील.

दुबार मतदार रोखण्यासाठी EC ने आणलं खास टूल

दुबार नोंद असलेल्या मतदारांच्या यादीवरून विरोधकांनी निवडणूक आयोगावर लक्ष्य केलेले असताना ही अडचण दूर करण्यासाठी एक विशेष टूल विकसित केल्याचे यावेळी सांगण्यात आले. या टूलच्या मदतीने, ज्या मतदारांची नावे दोन ठिकाणी नोंदवली गेली आहेत, त्यांच्या नावासमोर दोन तारे (**) दाखवले जातील. अशा मतदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जाईल आणि त्यांना कोणत्या मतदान केंद्रावर मतदान करायचे आहे हे विचारले जाईल. मतदाराने निवडलेले केंद्र त्याच्या मतदानासाठी निश्चित केले जाईल. परंतु, संबंधित मतदाराने प्रतिसाद दिला नाही, तर त्या मतदाराचे नाव सर्व संबंधित मतदान केंद्रांवर “डबल स्टार मतदार” म्हणून राहील. असा मतदार मतदान केंद्रावर प्रत्यक्ष मतदानासाठी आल्यानंतर, त्याच्याकडून “मी इतर कोणत्याही केंद्रावर मतदान केलेले नाही आणि करणार नाही” असे प्रतिज्ञापत्र घेतले जाईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली.

असा असेल निवडणूक कार्यक्रम

  • आगामी निवडणुकांसाठी अर्ज दाखल प्रक्रिया १० नोव्हेंबर २०२५ पासून सुरू होणार आहे.

  • अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख १७ नोव्हेंबरपर्यंत ठेवण्यात आली आहे.

  • अर्जांची छाननी १८ नोव्हेंबरला होईल.

  • अर्ज माघारी घेण्यासाठी २१ नोव्हेंबरपर्यंत मुदत दिली असून, आक्षेप असलेल्या ठिकाणी ही मुदत २५ नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे.

  • २६ नोव्हेंबर रोजी उमेदवारांची अंतिम यादी आणि निवडणूक चिन्ह जाहीर केले जाणार आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने ३१ जानेवारी २०२५ पूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश यापूर्वीच दिले होते. या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने आज अखेर २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला.

logo
marathi.freepressjournal.in