'ते अजितदादांना सांगतील...आता तुम्ही वेगळी निवडणूक लढवा'; जयंत पाटलांनी वर्तवली शंका!

अजितदादांना सोबत घेतल्याने भाजपची विश्वासार्हता कमी झाली आहे. त्यामुळे आता तुम्ही थोडसे दूर उभे राहा, असे भाजपवाले त्यांना म्हणू शकतील. तुम्ही वेगळी निवडणूक लढवा. निवडणुकीनंतर परत आपण जवळ येऊ.
'ते अजितदादांना सांगतील...आता तुम्ही वेगळी निवडणूक लढवा'; जयंत पाटलांनी वर्तवली शंका!
Published on

पुणे : अजितदादांना सोबत घेतल्याने भाजपची विश्वासार्हता कमी झाली आहे. त्यामुळे आता तुम्ही थोडसे दूर उभे राहा, असे भाजपवाले त्यांना म्हणू शकतील. तुम्ही वेगळी निवडणूक लढवा. निवडणुकीनंतर परत आपण जवळ येऊ. अशा प्रकारचा सल्ला दादांना दिला जाऊ शकतो, अशी शंका राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केली. सोमवारी पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वार्तालाप कार्यक्रमानंतर ते बोलत होते.

पाटील म्हणाले, महायुती अडचणीत असल्याने अजित पवार यांनी तात्पुरते वेगळे व्हावे, वेगळे लढावे, असे कदाचित त्यांना सांगितले जाऊ शकते. अजित पवार यांना सोबत घेतल्याने भाजपची विश्वासार्हता महाराष्ट्रातच नाही, तर सबंध देशात कमी झाली आहे, असे पाटील म्हणाले.

दरम्यान, पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित ‘महाराष्ट्र व्हिजन २०५०' या व्याख्यानात बोलताना सामाजिक, धार्मिक एकोपा आणि कायदा सुव्यवस्थेच्या अभाव, हे आजघडीला महाराष्ट्रासमोरील प्रमुख आव्हान आहे. त्याचबरोबर राजकीय नेत्यांनी स्वत:ची विश्वासार्हता गमावली असून, ती वाढवणे, हेही एक मोठे आव्हान असल्याचे मत जयंत पाटील यांनी सोमवारी येथे व्यक्त केले.

राजकीय पक्षांची विश्वासार्हता संपुष्टात

पाटील म्हणाले की, राज्यातील वातावरण बदलत आहे. प्रक्षोभक आणि द्वेष पसरविणारी वक्तव्ये आता सर्रास केली जातात. पोलीस यंत्रणा ते रोखू शकत नाही. शालेय संस्कार महत्त्वाचे असून, धर्मनिरपेक्ष पिढी निर्माण व्हायला पाहिजे. मात्र, आज परिस्थिती बदलली आहे. सर्वधर्मसमभावाची भावना दिसून येत नाही. हे चिंताजनक आहे. आम्ही राजकारणी लोक आम्हाला मते कसे मिळतील, याचाच विचार करतो. जनतेने याबाबतीत जबाबदारी घेऊन भूमिका घेणे आवश्यक आहे. तात्पुरत्या प्रलोभापेक्षा दूरदर्शी विकासाचा विचार जनतेने करायला हवा. राजकीय भ्रष्टाचार हे आव्हान आहे. राजकीय नेत्यांनी स्वतःची विश्वासार्हता पुरती गमावली आहे. ती वाढवणे हेही एक मोठे आव्हान आहे. राज्यात दोन घटना घडल्या, तेव्हापासून राजकीय पक्षांची विश्वासार्हता संपुष्टात आली असून, निवडणूक आयोगाचा कणाहीनपणाही अधोरेखित झाला आहे. यातून जनमानसाचा यंत्रणांवरचा विश्वास उडत असल्याकडे पाटील यांनी लक्ष वेधले.

आमचा मुख्यमंत्री व्हावा, असे लोकांना वाटते

शरद पवार यांची भूमिका त्यागाचीच राहिली आहे. महाविकास आघाडी एकसंध राहायला पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. आमचा मुख्यमंत्री व्हावा, असे लोकांना वाटते, असे सांगत सांगलीच्या विषयावर पांघरूण पडले आहे. ते आता उकरून काढण्याची गरज नाही. सांगलीतील दोन्ही तरुण मुले चांगली आहेत. त्यांच्या वडिलांबरोबर मी काम केले आहे. मी त्यांच्यावर काही बोलणार नाही. त्यावेळी गैरसमज झाले होते. आता दुरुस्ती झालेली आहे. सांगलीत कोणी कुणाचा कार्यक्रम केला नाही. परिस्थितीच तशी निर्माण झाली, असे त्यांनी सांगितले.

फडणवीस-अमित शहा यांच्यात अंतर निर्माण झालेय

पक्ष कसा चालला पाहिजे. याचा सर्वात जास्त अनुभव मला आहे. माझे दिवस मोजणाऱ्यांना ते कळून चुकले असेल, असे सांगत फडणवीस यांच्या मनात काय आहे, हे अमित शहा यांना कळत नाही आणि फडणवीस यांना कळत नाही की अमित शहा यांच्या मनात काय आहे. त्यामुळे दोघांमध्ये अंतर निर्माण झाले आहे. फडणवीस यांना महाराष्ट्रात सध्या नीट काम करता येत नसल्याचेही त्यांनी नमूद केले.

logo
marathi.freepressjournal.in