"तुम्ही आम्हाला फसवलं, तर तुम्हालाही डुबवणार..." मनोज जरांगेंचा सरकारवर हल्लाबोल

गावखेड्यातील गोरगरीब ओबीसी बांधवांनी काही केलं नाही. हे राजकारणी दहा बारा जणांचं टोळकं, ओबीसी समाजाचं वाटोळं करायला निघालंय, असं जरांगे म्हणाले.
संग्राहित छायाचित्र
संग्राहित छायाचित्र

जालना : भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी आज सकाळी वडिगोद्री येथे जाऊन ओबीसी आंदोलकांची भेट घेतली. त्यानंतर आज संध्याकाळी ओबीसी नेत्यांच्या नेतृत्वाखालील एक शिष्टमंडळ सरकारच्या भेटीला जाणार आहे. यामध्ये पंकजा मुंडे, छगन भुजबळ, गोपीचंद पडळकर, विजय वडेट्टीवार इत्यादी ओबीसी नेत्यांचा समावेश आहे. याबाबत मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. ओबीसी नेत्यांच्या दबावाखाली सरकार मराठ्यांवर १०० टक्के अन्याय करणार, असं जरांगे म्हणाले. ओबीसी नेते त्यांच्या समाजासाठी एकत्र येतात, तसे मराठा नेत्यांनीही समाजासाठी समोर यावं, असं आवाहनही मनोज जरांगेंनी मराठा नेत्यांना केलं. दरम्यान तुम्ही आम्हाला फसवलं, तर तुम्हालाही आम्ही डुबवणार, असा इशारा मनोज जरांगेंनी दिली आहे. आमच्या नोंदी १५० वर्षांपूर्वीच्या आहेत, आम्ही आरक्षणात आधीपासून होतो, असंही ते म्हणाले.

ओबीसी नेत्यांचे विचार उघडे पडले...

जरांगे ओबीसी नेत्यांवर बोलताना म्हणाले की, "गरीब मराठ्याच्या पोराला आरक्षण मिळायला लागलं, तर यांच्या तळपायाची आग मस्तकाला जातीये. ओबीसी नेत्यांचे काय विचार आहेत? मराठ्यांनो...यांचे विचार उघडे पडले का? मी मराठ्यांची, गोरगरीबांची खंबीरपणे पाठराखण करतोय. यांची नियत, द्वेष आणि विचार उघडे पडले की नाही? मराठ्यांचे नेते मला उघडे पाडत होते की, मी जातीवाद पसरवतोय. कळालं का आता कोण जातीवादी आहे ते? मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळालं पाहिजे, हेच मी लावून धरलंय. सगळ्यांचे चेहरे उघडे पडले."

ते ओबीसी समाजाचं वाटोळं करणार...

मंडल आयोगावर विचारलेल्या प्रश्नावर बोलताना जरांगे म्हणाले की, "गावखेड्यातील गोरगरीब ओबीसी बांधवांनी काही केलं नाही . हे राजकारणी दहा बारा जणांचं टोळकं, ओबीसी समाजाचं वाटोळं करायला निघालंय. मंडळ कमिशनला चॅलेंज देता येऊ शकतं आणि तो रद्दही होऊ शकतो. पण गोरगरीबांच्या अन्नात माती कालवणारी आमची मराठ्यांची औलाद नाही."

मराठा नेत्यांनो शहाणे व्हा....

मराठा नेत्यांना एकत्र येण्याचं आवाहन करताना जरांगे म्हणाले की, "मराठ्यांच्या नेत्यांनो आता यातून बाहेर पडा, जातीच्या मागे उभं राहायला शिका. बोललं असेल तुम्हाला कुणी, मी नाकारत नाहीये. मराठा नेत्याला त्रासही दिला असेल. पण जाऊद्या आपले आहेत. त्यांच्या त्रासापेक्षा हा त्रास कमीच आहे. हे तर आपल्या जातीच्या लेकरांची मुंडकीच छाटायला लागलेत. शहाणे व्हा, जरा बदला. ओबीसी नेते त्यांच्या आंदोलनात जाऊ शकतात, तर मराठ्यांचे नेतेही येऊ शकतात."

आपल्या नेत्यांना नालायक म्हणायचं बंद करा...

"मराठा समाजाच्या पोरांनो आपल्याला एक गोष्ट बदल करायला हवी. आपल्या नेत्यांना आता बोलायचं थोडं कमी करा. आपण आपल्याच नेत्याला झोडतोय. ते नालायक आहेत म्हणतोय. पण ओबीसी नेते नालायक असून त्यांचा समाज त्यांना काही म्हणत नाही. चांगलाच आहे म्हणतात. आता बदल करा. आपल्या नेत्यांना काहीबाही बोलणं बंद करा. ते त्यांच्या नेत्यांना जवळ करायला लागलेत आणि आपल्या नेत्यांना दूर लोटायला लागलेत. आपण त्यांच्याही नेत्यांना दूर लोटतोय आणि आपल्याही नेत्यांना दूर लोटतोय. आता आपल्या लोकांनीसुद्धा आपल्या नेत्यांना बोलायचं बंद करा," असं जरांगे म्हणाले.

पडलात तर पडलात, लाचारी पत्करू नका...

ते पुढे म्हणाले की, "आपणही यांचं शिकू. ओबीसी नेत्यांकडून शिकावं जातीवाद काय असतो. मराठ्यांच्या नेत्यांनो जरा शिकावं त्यांच्याकडून. निवडणूका झाल्या की ते एक झाले. कधीतरी लाज वाट वाटूद्या. पडलात तर पडलात, लाचारी पत्करू नका. जातीकडून राहा. ओरिजनल नोंदी सापडल्यात, त्याही रद्द करा म्हणतायत. आपल्या हक्काचं आरक्षण ओरबडायचंय. मी ओबीसी नेत्यांचा बुरखा फाडलाय. मराठ्यांनी विचार बदला. आपल्या ओरिजनल नोंदी रद्द करायला निघालेत. ते बोगस आरक्षण खातायत. मंडल कमिशननं फक्त १४ टक्के आरक्षण दिलं आहे. मुख्यमंत्री गृहमंत्र्यांना सांगतो ते रद्द करा."

१०० टक्के तुम्ही मराठ्यांवर अन्याय करणार....

जरांगे पुढे म्हणाले की, "फडणवीसांवर आम्ही विश्वास ठेवला. शंभुराजे देसाई म्हणाले मुख्यमंत्री आणि फडणवीस साहेबांवर विश्वास ठेवा. तुम्ही अन्याय होऊ देणार की नाही ते आमच्या लक्षात आलंय. तुम्ही ओबीसी नेत्यांच्या दबावामुळं मराठ्यांवर अन्याय करणार आहे. १०० टक्के तुम्ही मराठ्यांवर अन्याय करणार आहे. तुमच्या सगेसोरऱ्यांच्या व्याख्या बदलायला लागल्या आहेत. तुम्ही हैदराबादचं गॅझेट सापडलंय, ते लागू करत नाही. शिंदे आणि फडणवीस साहेब तुम्ही का सांगत नाही की, मराठ्यांच्या नोंदी सापडल्यात, ते आरक्षण आम्ही देणार. हैदराबादचं गॅझेट १५०-२०० वर्ष जुनं आहे. पश्चिम महाराष्ट्रासाठी साताराचं गॅझेट आहे. मुंबई गॅझेटही आहे, तुम्ही का सांगत नाही. तुम्ही ठासून सांगा, दुसऱ्या दिवशी जातीवाद बंद होईल."

...तर नाव बदलीन

"तुम्ही त्यांना फूस देता. आंदोलनही तुम्हीच उभं करता. माझ्या मराठ्यांना फसवायचं काम केलं, तर तुम्हाला डुबवलंच म्हणून समजा. मराठा समाज आता एक झालाय. हे आंदोलन करणारे आमचे विरोधक नाहीतच. आम्ही एकाही धनगर बांधवाला किंवा ओबीसीला दुखावलं नाही. तो येवलेवाला (छगन भुजबळ) चाबरा आहे. त्याला आणखी दोन नवीन जोड मिळालेत. शाळा करतोय, तुला राजकीय करिअरमधून उठवलं नाही, तर नाव बदलीन, तू किती पळतो, तेच पाहतो.

आमचं आरक्षण १५० वर्षापूर्वीचं....

जरांगे पाटील म्हणाले की, "मराठ्यांच्या नोंदी रद्द करा, अशी मागणी केली जाते. ५७ लाख नोंदी रद्द करा, याचा अर्थ काय होतो? तुम्ही नोंदीचा विषय काढायला नको होता. आमच्या दीडशे वर्षापूर्वीच्या नोंदी आहेत. तुमच्या नोंदीही नाहीत. मराठे गप्प बसले म्हणून तुम्हाला आरक्षण मिळालंय. ओबीसी आरक्षणात तुम्ही आलाय आमच्या, आम्ही नाही. खरंतर आम्ही म्हटलं पाहिजे आमचं आरक्षण बचाव, तर तुम्हीच म्हणायला लागलात. आमचं आरक्षण आहे १५० वर्षापूर्वीचं त्यात तुम्ही आला. तुम्हाला आता मंडल कमिशननं आरक्षण दिलंय आणि १९६७ ला सुद्धा दिलंय. सोयीनुसार शासननिर्णयावर ते दिलं आहे. मंडल कमिशननं १४ टक्के आरक्षण दिलं आहे. मी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना सांगतो बाकीचं बोगस आरक्षण काढून टाका."

जातीय तेढ नको म्हणून शांत...

"आम्हाला जातीय तेढ नको म्हणून आम्ही शांत आहोत. मी आरक्षण मागतोय, म्हणजे मी जातीवादी...आणि तुम्ही घेताय हा जातीवाद नाही का? काहींना १९६७ मिळालं, १९९०ला मिळालं, काहींनी अलीकडच्या काळात मिळालं. म्हणजे ते जातीवादी झाली का? आमची पोरं फाशी घ्यायला लागली. यांना आंदोलन मिळालं यांची पोरं आंदोलनात नाहीत. यांना महाज्योती, बार्टी चालते आमच्या सारथीवेळी हे उपोषणाला..अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाविरुद्ध आंदोलन. तुम्हाला आरक्षण आहे, सुविधा आहेत, नोकऱ्या लागल्यात. आम्हालाही नोकऱ्या लागूद्या, शिक्षण मिळूद्या म्हणून आरक्षण मागतोय. तुमच्या काय पोटात दुखतंय," असं जरांगे म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in