Manoj Jarange:मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली; तरीही सभेला राहणार उपस्थित

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे यांनी सरकाराला 24 डिसेंबरपर्यंत वेळ दिली आहे, दरम्यान, मुदत जवळ आली असतांना देखील जरांगे यांच्या अनेक प्रमुख मागण्या अजूनही सरकारने मान्य केल्या नाहीत.
Manoj Jarange:मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली; तरीही सभेला राहणार उपस्थित

राज्यात मराठा आरक्षणाचा विषय गेल्या अनेक महिन्यांपासून सुरु आहे. मराठा आरक्षणासाठी राज्यात गेल्या अनेक महिन्यांपासून उपोषण,प्रचार आणि मोर्चे सुरु आहेत. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी महाराष्ट्र दौरा सुरु केला होता. चौथ्या टप्प्यात महाराष्ट्राचा दौरा करणाऱ्या मनोज जरांगे यांची सोमवारी बीडच्या अंबेजोगाईच्या सभेत प्रकृती बिघडली होती. त्यामुळे त्यांना अंबेजोगाईच्या थोरात हॉस्पिटलमध्ये त्यांना उपचारासाठी तत्काळ दाखल करण्यात आले आहे. त्यांना ताप आला होता आणि प्रचंड अशक्तपणा देखील असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. तब्येत ठीक नसताना देखील आजच्या नियोजित सभांना उपस्थित राहण्याची भूमिका जरांगे यांनी घेतली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून मनोज जरांगे सतत वेगवेगळ्या जिल्ह्याचा दौरा करतांना दिसत आहेत. त्यांच्या अनेक सभा पहाटेपर्यंत चालल्याचे देखील पाहायला मिळाले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर त्यांची प्रकृती अधिक खालावली आहे. सोमवारी सुरवातीला धाराशिव जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील माकणी-करजगाव येथील सभेत त्यांची प्रकृती खालावली होती. त्यामुळे त्यांनी त्याचं भाषण बसूनच केले होते. पुढे बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई सभेत देखील त्यांना अस्वस्थ वाटत होते तिथे देखील त्यांनी बसूनच भाषण केले आहे. त्यानंतर त्यांना तत्काळ एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी केल्यावर त्यांना ताप प्रचंड अशक्तपणा आहे असं सांगितले होते. तसेच, त्यांनी विश्रांती घेतली पाहिजे असं डॉक्टरांनी सांगितले होते. परंतु, मनोज जरांगे आजच्या नियोजित सभांना उपस्थित राहण्याच्या भूमिकेवर ठाम असल्याची माहिती संयोजकांकडून देण्यात आली आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे यांनी सरकाराला 24 डिसेंबरपर्यंत वेळ दिली आहे, दरम्यान, मुदत जवळ आली असतांना देखील जरांगे यांच्या अनेक प्रमुख मागण्या अजूनही सरकारने मान्य केल्या नाहीत. त्यामुळे आता आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी 17 डिसेंबरला आंतरवाली सराटीमध्ये बैठक बोलवण्यात आली आहे. या बैठकीत कोणते निर्णय घेण्यात येणार हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in