नाशिक/वार्ताहर : येवला पवित्र होणार, डाग पुसला जाणार, भुजबळांचा ‘कार्यक्रम’ करणार, असा हल्लाबोल मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी नाशिकमध्ये मंत्री छगन भुजबळांच्या बालेकिल्ल्यात शांतता रॅलीच्या समारोपाप्रसंगी केला. नाशिकमधील मराठा समाज बांधवांनी येत्या २९ ऑगस्टला अंतरवाली सराटीत यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
माझ्या नादी लागलात तर नाशिक जिल्ह्याच्या बाहेर प्रचारालाही बाहेर पडू देणार नाही. शहाणा असेल त्याने माझ्या नादी लागू नये. येवल्यातील येड्याला किंमत देणार नाही, त्याचा कार्यक्रमच लावणार म्हणजे लावणार. येवल्यातील डाग धुतलाच म्हणून समजा, येवला पवित्र होणार, असे म्हणत जरांगे-पाटील यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्या चौफेर हल्ला केला.
फडणवीस यांनी अनेकांना मातीत घातले. अनेकांना संपवले. पण, त्यांना मी वस्ताद भेटलो आहे. फडणवीस तुम्ही राजकारण करू नका, आरक्षण द्या, नाहीतर भाजपचे आमदार पाडल्याशिवाय सोडणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
यावेळी जरांगे म्हणाले, कुणबी आणि मराठा एकच आहेत. त्यामुळे कोणीही आडवे आले तरी मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळणार आहे. गावागावांतील मराठ्यांनी २९ तारखेला अंतरवालीला यावे, पाडायचे की उभे करायचे हे २९ तारखेला ठरवू. आपल्याला ओबीसीमधूनच आरक्षण घ्यायचे आहे. अशी संधी पुन्हा येणार नाही. पक्ष आणि नेत्याला बाप मानण्याऐवजी समाजाला बाप माना. आरक्षण मिळत नाही म्हणून आपली लेकरे मोठी होत नाहीत. सरकारला आपल्याला आरक्षण द्यायचे नाही किंवा भाजपमधले लोक आरक्षण देऊ देत नाही, असे दिसतेय, अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली.
निवडणुकीत टांगा पलटी करायचा
मराठा ओबीसी आरक्षणात आहे. काही झाले तरी आरक्षण मिळवून द्यायचेय. सगळ्या पक्षातील मराठ्यांनो जागे व्हा. पक्षाला बाप मानण्यापेक्षा जातीला बाप माना आणि निवडणूक आल्यावर भावनिक होऊ नका. आरक्षण नसल्याने आपले लोक आणि विद्यार्थी मोठे होत नाहीत, हे बोंबलू नका. ४५ वर्षांपासून यांनी फसवलेय. आता निवडणुकीत यांचा टांगा पलटी करायचाय. आघाडी आणि युती का बैठक घेत नाही, असा सवालही त्यांनी केला.
शांतता रॅलीचा समारोप
शांतता रॅलीचा समारोप मंगळवारी दुपारी तपोवनातील साधुग्राम प्रवेशद्वार येथून झाला. जरांगे-पाटील यांचे तपोवनातील साधुग्राम येथे पावणेदोन वाजण्याच्या सुमारास आगमन होताच फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. याठिकाणी ट्रॅक्टर ट्रॉलीवर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून रॅलीला सुरुवात करण्यात आली.