अहमदनगर : जुन्या कामांची बिले मंजूर करण्यासाठी कंत्राटदाराकडून तब्बल १ कोटी रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एमआयडीसीच्या सहाय्यक अभियंत्याला अटक केली आहे. अमित किशोर गायकवाड (३२) या अभियंत्याने तत्कालीन उपविभागीय अभियंता गणेश वाघ याच्यासाठी लाच घेतल्याचे चौकशीत स्पष्ट झाले असून या दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय कंत्राटदार कंपनीच्या मालकाने नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे वाघ आणि गायकवाड यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या पथकाने अहमदनगरजवळ सापळा रचून शुक्रवारी गायकवाड याला अटक केली. गोपनीयता पाळत रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती. यामुळे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात खळबळ उडाली आहे.
या कंपनीने अहमदनगर येथील औद्योगिक विकास महामंडळांतर्गत १०० एम.एम. व्यासाची पाइपलाईन टाकण्याचे काम केले होते. या कामाचे दोन कोटी ६६ लाख ९९ हजार २४४ रुपयांचे बिल मिळावे म्हणून ते पाठपुरावा करत होते. मात्र, या बिलांवर तत्कालीन उपविभागीय अभियंता गणेश वाघ याच्याकडून मागील तारखेचे आऊटवर्ड मंजूर करून घेणे आवश्यक होते. त्याच्या बदल्यात गायकवाड याने स्वतःसाठी तसेच वाघ याच्यासाठीही लाच मागितली. या बिलाच्या कामाचे व यापूर्वीच्या अदा केलेल्या काही बिलांची बक्षीस म्हणून एक कोटी रुपये लाचेची मागणी करून लाच स्वीकारल्याचे आरोपींनी मान्य केले आहे.
तक्रार दाखल झाल्यावर नाशिक पथकाने शुक्रवारी दुपारी अहमदनगर-संभाजीनगर महामार्गावरील शेंडी शिवारात आनंद सुपर मार्केट बिल्डिंगच्या बाजूला सापळा लावला. त्यावेळी मागणी केलेली लाचेची एक कोटी रुपयांची रक्कम गायकवाड याने एका इनोव्हा कारमध्ये पंच, साक्षीदारांसमक्ष स्वीकारली. त्यानंतर गायकवाड याने त्याच्या मोबाईलवरून वाघ याला फोन करून लाचेची रक्कम मिळाल्याची माहिती दिली व त्याच्या हिस्स्याचे ५० टक्के कोठे पोहोचवायचेत, याबाबत विचारले. त्यावर वाघ याने सांगितले की, ‘राहू दे तुझ्याकडे, बोलतो मी तुला. ते तुलाच पोहचवायचे आहेत एका ठिकाणी, सांगतो नंतर. सध्या तुझ्या सेफ कस्टडीमध्ये ठेवून दे,’ असे म्हणून वाघ याने गायकवाड याच्या लाच मागणीस व स्वीकारण्यास प्रोत्साहन दिल्याचे सिद्ध झाले आहे.