
कसबा पोटनिवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आली असताना मनसेतुन एक मोठी बातमी समोर आली आहे. काँग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांचा प्रचार केला म्हणून ७ मनसे सैनिकांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. कसबा पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून हेमंत रासने आणि काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर यांच्यात लढत होणार आहे. अशामध्ये मनसेने कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीत भाजपला पाठिंबा जाहीर केला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आदेश असतानादेखील काही मनसे सैनिकांनी पक्षविरोधी कार्य केल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
कसबा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसचा प्रचार करणाऱ्या रवींद्र खेडेकर, सागर पांगारे, गोपी घोरपडे, अनिल बांदांगे, रिझवान मिरजकर, प्रकाश ढमढेरे, नीलेश कदम यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली, असे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनी पत्रक काढून जाहीर केले. ते म्हणाले की, "गेल्या काही वर्षांपासून या लोकांचा पक्षाच्या कार्यात योगदान नाही. पक्षाच्या कोणत्याही कामात किंवा कार्यक्रमात हे लोक सक्रिय दिसून येत नाहीत. मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर, अनिल शिदोरे, बाबू वागस्कर यांच्या आदेशाने पक्षविरोधी काम करणाऱ्या या सर्वांची पक्षातून हकालपट्टी करण्यात येत आहे." असे या पत्रात लिहिले आहे.