मुंबई : तब्बल दोन आठवडे उशिराने दाखल झालेल्या मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापल्याचे हवामान खात्याने रविवारी जाहीर केले. मात्र, अजूनही राज्याच्या अनेक भागांत पूर्ण क्षमतेने पाऊस पडला नसल्याने खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. दरम्यान, सोमवारी रायगड, रत्नागिरी, पुणे, नागपूर, गोंदिया, भंडारा जिल्ह्यांना ऑरेंज अॅलर्ट जारी करण्यात आला आहे.
शनिवारी मुंबईत पावसाचे जोरदार आगमन झाले. मात्र, तो मान्सूनचा पाऊस नव्हता. रविवारी सकाळपासून पडत असलेला पाऊस मान्सूनचा असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. विदर्भाच्या ९ जिल्ह्यांमध्ये मात्र शनिवारीच मान्सून दाखल झाला. शनिवारपासून मुंबई, ठाणे, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग यासह विविध जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. रविवारी मुंबई आणि परिसरात दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. काही उपनगरांमध्ये पावसाच्या दमदार सरी कोसळल्या. त्यामुळे शहराच्या अनेक भागांत पाणी साचले. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. गेल्या २४ तासांत चेंबूर परिसरात ८० मिमी पाऊस झाला, तर विक्रोळीत ७९, सायन ६१, घाटकोपर ६१, माटुंगा ६१ मिमी पाऊस झाला आहे.
हवामान विभागाने २६ ते २८ जूनपर्यंतचे पावसाचे अंदाज जारी केले आहेत. त्यानुसार २६ जूनला मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, परभणी, हिंगोली, नांदेड, चंद्रपूर आणि गडचिरोलीला यलो अॅलर्ट जारी केला आहे, तर २७ जून रोजी राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे. याशिवाय उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस होऊ शकतो. २८ जूनला पालघर, मुंबई, ठाणे, पुणे, रत्नागिरी आणि रायगड, नाशिक जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक राहील. या जिल्ह्यांना ऑरेंज अॅलर्ट देण्यात आला आहे.
सहा दशकांनी मुंबई, दिल्लीत एकाच वेळी मान्सून
यंदा देशाची राजधानी दिल्ली आणि आर्थिक राजधानी मुंबई या दोन्ही महानगरांत एकाच वेळी मान्सून दाखल झाला आहे. तब्बल सहा दशकानंतर या योगायोगाची पुनरावृत्ती होत आहे. यापूर्वी २१ जून १९६१ रोजी असे घडले होते. साधारणपणे मान्सून १ जून रोजी केरळ, ११ जून रोजी मुंबई आणि २७ जून रोजी दिल्लीत दाखल होतो, पण यंदा बिपरजॉय चक्रीवादळामुळे अरबी समुद्रातून येणाऱ्या पावसावर परिणाम झाला, तर बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या पावसाला कमी दाबाच्या पट्ट्यामुळे बळकटी मिळाली. त्यामुळे दिल्लीत नेहमीपेक्षा दोन दिवस आधी मान्सून दाखल झाला, तर महाराष्ट्रात मान्सूनच्या आगमनाला दोन आठवडे उशीर झाला आहे.