मुंबई-पुणे महामार्गावरील अपघात घटले; आयटीएमएस प्रणालीचे परिणाम

मुंबई ते पुणे दरम्यानच्या देशातील पहिला द्रुतगती महामार्गावरील वाढते अपघात टाळण्यासाठी बुद्धिमान वाहतूक व्यवस्थापन प्रणालीमुळे (आयटीएमसी) अपघातांचे प्रमाण कमी झाले आहे.
मुंबई-पुणे महामार्गावरील अपघात घटले; आयटीएमएस प्रणालीचे परिणाम
Published on

मुंबई : मुंबई ते पुणे दरम्यानच्या देशातील पहिला द्रुतगती महामार्गावरील वाढते अपघात टाळण्यासाठी बुद्धिमान वाहतूक व्यवस्थापन प्रणालीमुळे (आयटीएमसी) अपघातांचे प्रमाण कमी झाले आहे.

गेल्या चार महिन्यांत मुंबई ते पुणे महामार्गावरील अपघातात मृतांची संख्या घटली आहे. मुंबई-पुणे महामार्गावर यंदा जानेवारी ते एप्रिल दरम्यान ११ जणांचा मृत्यू झाला तर समृद्धी महामार्गावर याच कालावधीत ५५ जणांचा मृत्यू झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

महाराष्ट्र महामार्ग पोलिसांनी सांगितले की, जानेवारी ते एप्रिल २०२५ या कालावधीत मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर १० भीषण अपघात झाले. त्यात ११ जणांचा मृत्यू झाला. याच कालावधीत मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर ४७ अपघात झाले, ज्यात ५५ लोकांनी प्राण गमावले.

मुंबई-पुणे महामार्गावर गेल्या काही वर्षांत अपघातांचे प्रमाण वाढले होते. लेन कटिंग, भरधाव वेग आदींमुळे अनेकांचे बळी जात होते. त्यामुळे या द्रुतगती महामार्गाच्या व्यवस्थापनावर टीका होत होती.

राज्य परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनुसार, जुलै २०२४ पासून मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आयटीएमएस ही प्रणाली लागू करण्यात आली होती. या प्रणालीची कठोर अंमलबजावणी सुरू झाली. महामार्गावर गस्त वाढवली तसेच जनजागृती मोहिमांमुळे अपघात कमी झाले आहेत.

१७ नियम भंगाची कॅमेऱ्यात नोंद

या आधुनिक आयटीएमएस प्रणालीतंर्गत वेगमर्यादा ओलांडणे, बेकायदेशीर पार्किंग, चुकीची दिशा, सीटबेल्ट न वापरणे, वाहन चालवताना मोबाईल वापरणे, आणि लेन कटिंग अशा १७ नियमभंगांची आधुनिक कॅमेरे आणि स्वयंचलित यंत्रणांद्वारे नोंद घेतली जाते. अतिरिक्त परिवहन आयुक्त भरत काळस्कर म्हणाले की, आयटीएमएसने अतिवेगाला चाप लावण्यात यश आले आहे. कारण या महामार्गावर लोक वेगाने वाहन चालवत होते. ते अपघातांच्या मुख्य कारणांपैकी एक असल्यामुळे मृत्यूंच्या प्रमाणातही घट झाली आहे. वाहकांना अनेक ई-चलने मिळाल्यानंतर ते वेगमर्यादा पाळतात. आयटीएमएसमुळे अतिवेग आणि लेन कटिंग कमी झाले आहे. वेग आणि मृत्यू याचा थेट संबंध असल्याने, नियंत्रणामुळे अपघातांचे प्रमाणही घसरले आहे," असे त्यांनी सांगितले.

मुंबई-पुणे द्रूतगती महामार्ग ९५ किमीचा आहे. हा देशातील पहिला प्रवेश-नियंत्रित सहा मार्गिकांचा महामार्ग आहे. तो आर्थिक राजधानीला पुण्याशी जोडतो.

७०१ किमी लांबीचा मुंबई-नागपूर दरम्यानचा समृद्धी महामार्ग आहे. सध्या नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी ते नागपूरदरम्यान कार्यरत आहे. अंतिम टप्पा इगतपुरी ते ठाणे जिल्ह्यातील आमणे दरम्यानचा असून तो लवकरच सर्वसामान्यांसाठी खुला होण्याची शक्यता आहे.

समृद्धीवरही हीच प्रणाली बसवणार

२०२४ मध्ये मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर एकूण १९१ अपघात झाले. त्यापैकी ७४ भीषण होते आणि त्यात ९० जणांचा मृत्यू झाला. समृद्धी महामार्गावर १३७ अपघात नोंदवले गेले, त्यापैकी ९६ भीषण अपघात होते आणि १२६ जणांचा मृत्यू झाला, असे अधिकृत आकडेवारीत नमूद आहे.

logo
marathi.freepressjournal.in