
काल छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली. यावेळी त्यांची तब्येत खराब असल्याचे कारण सांगण्यात आले होते. तर, आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीदेखील त्यांची तब्येत ठीक नसल्याने गैरहजर राहिल्याचे सांगितले. मात्र, आज नाना पटोले हे सुरतमध्ये दाखल झाले होते. त्यामुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे. राहुल गांधी हे सुरत न्यायालयात येणार असल्याने अनेक काँग्रेस नेते आज गुजरातमध्ये दाखल झाले आहेत. अशामध्ये नाना पटोलेसुद्धा सुरतमध्ये उपस्थित आहेत.
काल महाविकास आघाडीच्या सभेमध्ये नाना पटोले उपस्थित नसल्याने ते नाराज असल्याची चर्चा रंगली होती. मात्र, तब्येत खराब असल्याने ते उपस्थित राहू शकले नाही असे सांगण्यात येत होते. यावर नाना पटोलेंनी स्पष्टीकरण देताना सांगितले की, "मी काल दिल्लीमध्ये असल्याकारणाने सभेला उपस्थित राहू शकलो नाही. माझी तब्येत एकदम ठणठणीत आहे. पण माझ्यामुळे इतरांच्या तब्येती खराब होतील," असा टोलादेखील त्यांनी लगावला. दरम्यान, आज राहुल गांधी मोदी आडनाव मानहानी प्रकरणात झालेल्या शिक्षेवरून याचिका दाखल करणार आहेत. यावेळी काँग्रेसचे अनेक नेते आपली उपस्थिती दर्शवणार आहेत.