
भास्कर जामकर/नांदेड
नांदेड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या वतीने यंदा पहिल्या वर्गात नव्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक अभिनव आणि भावनिक उपक्रम राबवण्यात येत आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या संकल्पनेतून साकारत असलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा शालेय जीवनातील प्रारंभ अधिक गोड आणि संस्मरणीय ठरणार आहे.
पहिल्या वर्गात प्रवेश घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला एक विशेष 'आठवणींचा फॉर्म' देण्यात येणार आहे. या फॉर्ममध्ये शाळेचे नाव, तालुका, विद्यार्थ्याचे नाव, आई-वडिलांची नावे, विद्यार्थ्याने लिहिलेले पहिले मराठी व इंग्रजी अक्षर, पहिली संख्या, त्याचे स्वतःचे विचार आणि एक छायाचित्र अशा विविध गोष्टींची नोंद घेण्यात येईल.
या फॉर्मवर “हे पत्र २०३५ ला उघडून पहा आणि आमची आठवण करा…” असा खास संदेश लिहिण्यात आला असून, जेव्हा हे विद्यार्थी दहावीत पोहोचतील, तेव्हा त्यांनी हा फॉर्म पुन्हा उघडून पहावा आणि आपल्या शालेय जीवनाच्या पहिल्या दिवसाच्या आठवणींना उजाळा द्यावा, असा या उपक्रमामागील मनापासूनचा हेतू आहे. हा फॉर्म शाळेकडे किंवा पालकांकडे सुरक्षित ठेवला जाणार असून, विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी तो एक अनमोल आठवण ठरणार आहे. शालेय शिक्षणाच्या सुरुवातीलाच विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये भावनिक नातं निर्माण करणारा, शाळेशी आत्मीयता वाढवणारा आणि शिक्षण प्रक्रियेविषयी आत्मस्मरण जागवणारा हा उपक्रम जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या सर्जनशीलतेचे उत्कृष्ट उदाहरण ठरत आहे. समुदाय आरोग्य अधिकारी यांच्यामार्फत विद्यार्थ्यांची उंची, वजन मोजणे आणि इतर प्राथमिक आरोग्य तपासण्या करण्यात येतील.
पहिली प्रवेशासाठी विशेष उद्दिष्ट
जिल्हा परिषद शाळांमध्ये इयत्ता पहिलीसाठी यावर्षी एकूण ३२ हजार ५९ विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र आहेत. मात्र गुणवत्तापूर्ण शिक्षणाची संधी अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावी या उद्देशाने यंदा दहा टक्के जास्तीचे उद्दिष्ट ठेवून प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार आहे. त्यानुसार एकूण सुमारे ३५ हजार २६५ विद्यार्थ्यांचे प्रवेशाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.
२५५ शाळांमध्ये आरोग्य तपासणी
नांदेड जिल्हा परिषदेच्या २५५ शाळांमध्ये शाळेच्या पहिल्या दिवशी १६ जुन रोजी इयत्ता पहिली व अन्य वर्गातील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. यात विद्यार्थ्यांचे वजन, उंचीसोबतच शारीरिक तपासण्या होणार आहेत. यात काही आढळल्यास त्या विद्यार्थ्यावर पुढील उपचार देण्यात येणार आहेत. या संदर्भात शिक्षण विभागाने ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांची यादी तयार केली आहे.
प्रत्येक विद्यार्थ्यासाठी ‘स्मरणघडी पत्रिका’
प्रत्येक विद्यार्थ्याचा उजव्या हाताचा ठसा चार्ट पेपरवर घेऊन तो वर्गात लावण्यात येईल. प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांकडून 'स्मरणघडी पत्रिका' भरून घेतली जाईल. ही पत्रिका २०३५ साली उघडून त्या दिवसाचे स्मरण करण्याचा संदेश दिला जाईल. तसेच इयत्ता पहिलीतील प्रवेशित विद्यार्थी, मुख्याध्यापक व शाळेतील शिक्षक यांचा सामूहिक फोटो काढण्यात येईल. या फोटोची प्रत प्रत्येक विद्यार्थ्याला वितरित केली जाईल.