
जळगाव : मराठा आरक्षण ओबीसी कोट्यातून दिले जाऊ नये. कुणबी आणि मराठा असा वाद निर्माण करू नये. असे सांगतानाच सध्याची आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा वाढवली जावी. त्याशिवाय आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही, असे मत राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी मंगळवारी जळगावात पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केले.
मंगळवारी सकाळी शरद पवार यांचे जळगावमध्ये आगमन झाले असता त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. दुपारी त्यांनी सागर पार्क मैदानावर जाहीर सभा घेतली. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर ही शरद पवारांची पहिलीच सभा होती. त्यामुळे या सभेकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले होते. सभेला अपेक्षित प्रतिसाद मात्र मिळाला नाही.
देशातील अनेक जागांवर भाजपने उमेदवार बदलण्याची तयारी सुरू केली आहे. याचाच अर्थ जनता आमच्या पाठीशी आहे. भाजपच्या जागा पराभूत करण्यासाठी आम्ही निश्चित प्रयत्न करणार असून महाराष्ट्रात नव्हे, तर संपूर्ण देशात आगामी लोकसभा निवडणुकीत आहे ते चित्र बदललेले दिसेल, असा आशावाद पवार यांनी बोलताना व्यक्त केला.
“नवाब मलिक जुने नेते आहेत. त्यांना तुरुंगात टाकले. लोकांनी दिलेली सत्ता ही त्यांना सन्मानाने जगता कशी येईल, यासाठी वापरायची असते. पण त्याऐवजी आज सत्तेचा गैरवापर भाजपने केलेला आहे. ‘एक देश, एक निवडणूक’ हा मुद्दा देशवासीयांचे लक्ष विचलित करण्यासाठी असल्याचा दावा त्यांनी केला.
‘खानदेशचा इतिहास’ हा अभिमानास्पद असल्याचे सांगत काँग्रेसचे पहिले अधिवेशन जळगाव जिल्ह्यात फैजपूर येथे नेहरू गांधी यांच्या उपस्थितीत झाल्याचे ते म्हणाले. जळगाव जिल्ह्याचा इतिहास हा काँग्रेससाठी लाभदायी कसा आहे हे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. जिल्ह्यात आणि राज्यातही आज दुष्काळाचे सावट असून मोठ्या प्रमाणावर पाणीटंचाई आहे. टँकरने पाणी आणावे लागते. शेतकरी संकटात असताना शासन उदासीन असल्याची तक्रार त्यांनी केली. राज्यकर्त्यांना आज शेतकऱ्यांबद्दल आस्था नाही. चिंता उरली नाही. सत्ता चुकीच्या लोकांच्या हातात गेली आहे. पंतप्रधान मोदींनी यंत्रणांचा गैरवापर करून शिवसेना आणि नंतर राष्ट्रवादी फोडली.
या सभेला अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड, अरुण गुजराती, एकनाथ खडसे, रोहिणी खडसे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आदी उपस्थित होते.
मोदींनी ९ वर्षांत काय केले?l
देशात आज काय चित्र दिसतंय? मोदी साहेबांचे राज्य आहे. त्यांनी काय केले? ९ वर्ष झाली. इतर राजकीय पक्ष फोडणे. शिवसेना फोडली, राष्ट्रवादी फोडली, फोडाफोडीचे राजकारण, एवढी एकच गोष्ट केली. दुसऱ्या बाजूने आपल्या हातात जी सत्ता आहे ती लोकांसाठी वापरायची. त्याच्याऐवजी सीबीआय, ईडीकडून छापेमारी करून खोटे खटले दाखल करायचे. काही संबंध नसताना काही महिने तुरुंगात टाकण्याचं काम केलं, असा आरोप त्यांनी केला.