राष्ट्रवादीच्या नव्या जिल्हाध्यक्षाचा निर्णय पवारांच्या कोर्टात; विधानसभेसाठी जिल्हाध्यक्ष न बदलण्याचा सभेचा सूर

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचा जिल्हाध्यक्ष बदलण्याबाबत रविवारी अनिल देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
राष्ट्रवादीच्या नव्या जिल्हाध्यक्षाचा निर्णय पवारांच्या कोर्टात; विधानसभेसाठी जिल्हाध्यक्ष न बदलण्याचा सभेचा सूर

विजय पाठक/ जळगाव

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचा जिल्हाध्यक्ष बदलण्याबाबत रविवारी अनिल देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत सध्या असलेले जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील यांना बदलू नये, असा सूर उमटला. मात्र माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांनी पक्षाच्या मंथन सभेत सर्व पदाधिकारी बदलण्याचा ठराव झालेला असल्याने आजच्या सभेचा अहवाल निरीक्षक माजी मंत्री अनिल देशमुख हे वरिष्ठांना सादर करतील व याबाबत शरद पवार जो निर्णय घेतील, तो सर्वांनी मान्य करावा असे आवाहन करण्यात आले. त्यामुळे आता जिल्हाध्यक्ष निवडीचा निर्णय हा पक्षनेते शरद पवारांच्या कोर्टात असल्याचे स्पष्ट झाले.

महाराष्ट्रात शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसला चांगले यश मिळाले असताना जळगाव जिल्ह्यात मात्र पराभव पत्करावा लागला. याबाबत दि. १ जुलैला जळगाव येथे पक्षाची मंथन सभा आयोजित करण्यात आली होती. त्यात माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांनी हे पदाधिकारी उदासीनतेमुळे घडल्याचे सांगत पक्षाच्या सर्व कार्यकारिणी बरखास्त करून नवीन जिल्हाध्यक्ष व नवे पदाधिकारी नेमण्याची सूचना केली होती. या सूचनेला सर्व पदाधिकाऱ्यांनी सहमती दर्शवल्याने जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील यांनी लगेच राजीनामा देत सर्व कार्यकारिणी बरखास्त केली होती. त्यानंतर रविवारी नवीन जिल्हाध्यक्ष निवडीसाठी माजीमंत्री अनिल देशमुख उपस्थितीत इच्छुकांच्या मुलाखती घेण्यासाठी सभेचे आयोजन करण्यात आले होते.

पराभवाच्या पाश्वर्भूमीवर उपस्थित पदाधिकाऱ्यांना आपल्या भावना व्यक्त करण्यास सांगितल्यावर नितीन तायडे यांनी प्रथम जिल्ह्यात ज्या जागा लढवायच्या त्या निश्चित करा, पदाधिकाऱ्यावर जबाबदारी निश्चित करा, कोण काम करत, कोण करत नाही यावर लक्ष ठेवायला हवे. प्रत्येक सूचना कार्यकर्त्यांपर्यंत पोहचली पाहिजे. यासाठी संपर्क प्रमुखांनी संपर्क ठेवणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले तर पाटील यांनी जामनेरची जागा अन्य पक्षाला सोडू नका, अशी मागणी केली. जळगावचे ॲड. सतीश पाटील यांनी संघटनेने काम न केल्याने पक्षाचा पराभव झाल्याचे स्पष्टपणे सांगत कार्यक्षम जिल्हाध्यक्ष देण्याची मागणी केली. किसन जोर्वकर यांनी कार्यकर्त्यांना ताकद दिल्यास यश मिळेल असे सांगितले.

अनेक जणांनी संघटन वाढण्यासाठी रावेर आणि जळगाव लोकसभानिहाय दोन जिल्हाध्यक्ष देण्याची मागणी केली तसेच तीन महिन्यांवर विधानसभा निवडणूक असल्याने जिल्हाध्यक्ष बदलू नये असा एकमुखी सूर सभेत उमटला. नवीन पदाधिकारी नेमत असतांना तीन महिने जातील व संघटन उभे राहणार नाही, अशी भीती व्यक्त करत सध्या असलेले जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील यांना निवडणुका संपेपर्यत राहू देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. माजी मंत्री सतीश पाटील यांनी आपल्या मंथन बैठकीत ठरल्याप्रमाणे जिल्हाध्यक्षांनी राजीनामा दिलेला आहे. नवीन जिल्हाध्यक्ष निवडला जाईल त्याच्यामागे ताकद लावूया. अनिल देशमुख हे वरिष्ठांना आपला अहवाल देतील, नंतर अध्यक्ष शरद पवार जिल्हाध्यक्षांची नेमणूक करतील असे सांगत जिल्हाध्यक्ष निवडीचा चेंडू पवारांच्या कोर्टात टाकून नवा जिल्हाध्यक्ष निवडण्यावर ठाम असल्याचे दाखवून दिले. माजी मंत्री गुलाबराव देवकरांनी देखील बदल करायचा आहे, हे ठरवूनच ही सभा घेत असल्याचे सांगत जो निर्णय पक्ष देईल तो मान्य करावा व नव्या अध्यक्षांना सहकार्य करण्याचे आवाहन सर्व पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांना केले. शेवटी अनिल देशमुख यांनी विधानसभा निवडणूक महत्त्वाची असून त्यात आपल्या जिल्ह्यातून जास्तीत जास्त आमदार निवडून येण्याचा प्रयत्न करा, असे आवाहन केले.

प्रारंभी जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांनी देशमुख व उपस्थितांचे स्वागत केले. सभेचे संचलन व आभार वाय. एस. महाजन यांनी मानले. सभेस जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, माजी मंत्री डॉ. सतीश पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी आमदार अरूण पाटील, डॉ. बी. एस पाटील, श्रीराम पाटील,महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसेसह जिल्हा पदाधिकारी, तालुका अध्यक्ष उपस्थित होते.

निवडणूक जिंकण्यासाठी शिंदे सरकारकडून घोषणाबाजी

प्रारंभीच बोलताना निरीक्षक अनिल पाटील यांनी लोकसभा निवडणुकीनंतर आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी पक्षात चांगले वातावरण आहे. आपल्याला मविआसोबतच निवडणूक लढवायची असल्याचे सांगून त्यासाठी चांगला समन्वय ठेवून एकोप्याने निवडणूक लढवण्याची गरज असून त्यासाठी कामाला लागण्याचे पदाधिकाऱ्यांना आवाहन करण्यात आले. शेतकऱ्याच्या कापसाला भाव मिळत नसल्याने शेतकरी नाराज आहे, असे सांगत येणारी ही निवडणूक जिंकण्यासाठी शिंदे सरकारने काही घोषणा केल्या, तरीही आपल्याला ही निवडणूक चांगल्या पद्धतीने जिंकायची असल्याचे सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in