अयोध्या दौऱ्याला विरोध म्हणजे मला अडकवण्याचा ट्रॅप ; राज ठाकरे

अयोध्या दौऱ्याला विरोध म्हणजे मला अडकवण्याचा ट्रॅप ; राज ठाकरे

अनेकांना माझी अयोध्या वारी खुपली. त्यामुळेच आपल्याला त्यात अडकवण्याचा आराखडा रचला गेला. दौऱ्याबाबत मुद्दाम वातावरण तापवले गेले. युपीच्या एका खासदाराची त्यांच्याच मुख्यमंत्र्यांना विरोध करण्याची हिम्मत कशी काय होते?, असा सवाल करत या विरोधाची रसद महाराष्ट्रातून पुरवली गेली, असा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला. मात्र हा ट्रॅप कोणी रचला याचा उल्लेख ठाकरे यांनी जाणीवपूर्वक टाळला. राज ठाकरे यांचा रोख शिवसेनेवर होता की भाजपवर, यावर आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.

पुण्यात आयोजीत सभेत राज ठाकरे म्हणाले, ‘‘मला अयोध्येत केवळ राम मंदिराचे दर्शन घ्यायचे नव्हते. बाबरी मशिदीचे आंदोलन झाल्यानंतर अयोध्येत काही कारसेवकांचीही जाळून हत्या करण्यात आली होती. ती जागाही मला पाहायची होती. मात्र, मला विरोध करुन काहींनी हिंदुत्वाचेच नुकसान केले. माझ्या दौऱ्याला विरोध नेमका का होतोय, याबाबत मुंबईसह युपीतूनही माहिती मिळवली, तेव्हा आपल्याला हा अडकवण्याचा ट्रॅप आहे, हे मला समजले. मी हट्टाने अयोध्या दौऱ्याला जायचे

असे ठरवलेच तर मनसैनिकांसह हजारो हिंदु बांधव दौऱ्यावर आले असते. दौऱ्यात आपल्याला कुणी डिवचले असते तर मनसैनिकही अंगावर धावले असते. त्यानंतर मनसैनिक आणि पदाधिकाऱ्यांना केसेसमध्ये अडकवून तुरुंगात सडवले गेले असते. राज्यात ऐन निवडणूक असतानाच आपल्यावर कारवाईचा फास आवळला गेला असता. हा सर्व ट्रॅपच होता.’’

उत्तर भारतीयांना मारहाण केल्याप्रकरणी राज ठाकरेंनी माफी मागावी; अन्यथा त्यांना युपीत पाऊल ठेवू देणार नाही, असा इशारा युपीचे खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी दिला आहे. त्यावर राज ठाकरे यांनी गुजरातमधील एका घटनेची आठवण ब्रिजभूषण सिंह यांना करुन दिली. काही वर्षांपुर्वी गुजरातमध्ये एका मुलीवर बलात्कार झाल्यानंतर शेकडो युपी, बिहारच्या कामगारांना ठार मारण्यात आले. त्यानंतर काही बचावलेले कामगार मुंबईत आले. गुजरातमधील या घटनेवरून ब्रिजभूषण कोणाकडे माफीची मागणी करणार, असा सवाल राज ठाकरेंनी केला. एवढ्या वर्षांनंतर उत्तर भारतीयांची आठवण कशी झाली, असा सवाल करत हे राजकारण समजून घ्या, असे आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केले.

मशिदींवरील भोंग्यांसाठी आंदोलन केल्यानंतर मनसेच्या हजारो कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. आता मशिदींवरील भोंग्याचा आवाज कमी करण्यासाठी प्रशासन मशिदींच्या व्यवस्थापकांसोबत चर्चा करत आहे. म्हणजेच ज्यांनी कायद्यांचा आग्रह धरला त्यांच्यावर गुन्हे दाखल करुन त्यांचा छळ केला जात आहे. तर, बेकायदा वागणाऱ्यांसोबत राज्य सरकार चर्चा करत आहे. हे कोणते कायद्याचे राज्य, असा सवाल राज ठाकरेंनी केला. महाविकास आघाडी पाहून बाळासाहेब ठाकरे यांना आनंद झाला असता, असे वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी केले होते. त्यावरही राज ठाकरे यांनी टिका केली. असे वक्तव्य करुन बाळासाहेब ठाकरेंची प्रतिष्ठा कमी करु नका. तुम्हाला बाळासाहेब ठाकरे तरी समजले आहेत का, असा सवाल त्यांनी केला.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in