
मुंबई : महाड एमआयडीसीतील ब्ल्यू जेट हेल्थकेअर लिमिटेड कंपनीत झालेल्या स्फोटात आतापर्यंत सात कामगारांचे मृतदेह सापडले आहेत. या दुर्घटनेतील बेपत्ता कामगारांचा शोध सुरू आहे. दरम्यान, या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत.
कंपनीच्या प्लांटमध्ये गॅस गळती झाल्याने स्फोट झाला असावा, अशी शक्यता आहे. पण, प्राथमिक तपासात शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी, असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. कंपनीत रसायनाने भरलेले पिंप होते. आगीत या पिंपांचा एकामागोमाग एक स्फोट झाला. त्यामुळे आग अधिक भडकली.
बेपत्ता कामगारांना शोधण्याचे काम वेगाने सुरू आहे. स्थानिक प्रशासन व एनडीआरएफ हे काम करत आहे. या कंपनीचे मुख्यालय सानपाडा, नवी मुंबईत आहे. ही कंपनी औषधासाठी लागणारी रसायने बनवते. कंपनीचे चार प्लांट आहेत. या दुर्घटनेनंतर कंपनीकडून एकही निवेदन जारी केले नाही. विशेष म्हणजे १ नोव्हेंबर रोजी कंपनीचे समभाग शेअर बाजारात नोंदणीकृत झाले होते. आयपीओत प्रति शेअरची किंमत ३४६ रुपये होती. हा समभाग ३८० रुपयांना बाजारात ‘लिस्ट’ झाला होता.