मुंबई : राष्ट्रवादीच्या अजित पवार यांना सोबत घेण्याचा फटका भाजपला लोकसभा निवडणुकीत बसला, अशी टीका रा. स्व. संघाच्या ‘ऑर्गनायझर’ या वृत्तपत्रात करण्यात आल्यानंतर आता राज्यातील भाजपचे बडे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत:च अजित पवारांना आमच्यासोबत घेतल्याचे मतदारांना आवडले नाही, अशी कबुली दिली आहे.
एका वृत्तवाहिनीच्या विशेष कार्यक्रमात फडणवीस यांनी सद्यस्थितीतील राजकीय परिस्थितीविषयी भाष्य केले. ते म्हणाले की, “आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेतले, ते आमच्या मतदारांना आवडले नाही. अजिबात आवडले नाही, हे मी मान्य करतो. पण, ते जेव्हा आमच्यासोबत आले, ते कोणत्या परिस्थितीत आले? कोणत्या परिस्थितीत त्यांना सोबत घ्यावे लागले? कधी-कधी तडजोड करावी लागते, अशी परिस्थिती अनेकदा राजकारणात येते, हे आमच्या कोअर नेत्यांना माहीत आहे. पण जनतेला व कार्यकर्त्यांना ते पटले नाही. अनेक तडजोडी अशा असतात की, ज्या तुम्हाला किंवा तुमच्या लोकांना मनापासून आवडत नाहीत, पण कराव्या लागतात. अशा तडजोडी आम्ही या प्रकरणात केल्या. लोकसभा निवडणुकीनंतर नाराज झालेल्या समर्थकांना ही तडजोड का करावी लागली, हे समजावण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत,” असा दावाही त्यांनी केला.
शिंदे, अजितदादांचे पक्ष हे ‘नवीन पक्ष’
“लोकसभेला एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची मते आम्हाला जास्त मिळाली. त्या तुलनेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची मते आम्हाला कमी मिळाली. पण हे दोन्ही पक्ष एकप्रकारे फुटून निघालेले ‘नवीन पक्ष’ होते, हेसुद्धा लक्षात घ्यावे लागेल. त्यामुळे त्यांच्यासाठी ही निवडणूक त्यांचा मतदारवर्ग तयार करण्याची होती. त्यातून मते आमच्याकडे हस्तांतरित करणे कठीण काम होते. भाजप हा स्थिर पक्ष असल्यामुळे आमच्यासाठी ते कठीण काम नव्हते. त्यामुळे आमची मते आम्ही त्यांच्याकडे वळवू शकलो. विधानसभेत मात्र हे होणार नाही. विधानसभेत ते नक्कीच मते आमच्याकडे वळवू शकतील,” असे फडणवीस म्हणाले.
भाजपला कमकुवत म्हणणे चुकीचे
लोकसभा निवडणुकीत भाजप २३ जागांवरून थेट ९ खासदारांवर आला, असे विचारले असता फडणवीस म्हणाले की, “भाजप राज्यात कमजोर झालेला नाही. भाजपला कमकुवत म्हणणे हे चुकीचे विश्लेषण आहे. भाजपने ९ जागा जिंकल्या. १२ जागांवर भाजप ३ टक्क्यांपेक्षा कमी फरकाने हरला आहे. पूर्ण विश्लेषणात आम्हीच पहिल्या क्रमांकाचा पक्ष आहोत. आम्हालाच सर्वाधिक मते मिळाली आहेत.”
आमचा स्ट्राइक रेट सरस
“लोकसभा निवडणुकीतील स्ट्राइक रेटला काही महत्त्व नाही. आकडे तुम्हाला जसे हवेत, तसे सांगू शकता. कुणी व्यक्ती एका बॉलमध्ये चार धावा काढून बाद झाला, तर त्याचा स्ट्राइक रेट जास्तच राहणार आहे. स्ट्राइक रेट म्हणजे फक्त आकड्यांचा खेळ आहे. दुसरा १०० धावा करूनही स्ट्राइक रेटमध्ये ८०वरच राहू शकतो. महाराष्ट्रात क्रमांक एकचा पक्ष भाजप होता, भाजप आहे आणि भाजपच राहील,” असे फडणवीस म्हणाले.