राज्यात पूर्वीच्या सरकारांकडे दूरदृष्टीचा अभाव; पंतप्रधानांची विरोधकांवर टीका, महाराष्ट्रातील ११,२०० कोटींच्या प्रकल्पांचे उद्घाटन व भूमिपूजन

राज्यात अन्य पक्षांचे सरकार असताना मेट्रो, मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन, बिडकीन औद्योगिक क्षेत्र, सिंचनसह अनेक प्रकल्प रखडले होते. मागील सरकारकडे दूरदृष्टीचा अभाव असल्याने राज्यातील शहरांचे नियोजन झालेच नाही, अशी जोरदार टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.
राज्यात पूर्वीच्या सरकारांकडे दूरदृष्टीचा अभाव; पंतप्रधानांची विरोधकांवर टीका, महाराष्ट्रातील ११,२०० कोटींच्या प्रकल्पांचे उद्घाटन व भूमिपूजन
एएनआय
Published on

राज्यात अन्य पक्षांचे सरकार असताना मेट्रो, मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन, बिडकीन औद्योगिक क्षेत्र, सिंचनसह अनेक प्रकल्प रखडले होते. मागील सरकारकडे दूरदृष्टीचा अभाव असल्याने राज्यातील शहरांचे नियोजन झालेच नाही, अशी जोरदार टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.

राज्यातील ११,२०० कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचे भूमिपूजन व उद्घाटन रविवारी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते आभासी पद्धतीने (व्ह्रर्च्युअल) झाले. जिल्हा न्यायालय ते स्वारगेट मेट्रो स्टेशन, बिडकीन औद्योगिक प्रकल्पाचे उद्‍घाटन, स्वारगेट ते कात्रज भुयारी मेट्रो, भिडे वाडा स्मारकाचे भूमिपूजन आदी कामांचा त्यात समावेश होता.

ते म्हणाले की, मागील सरकारचे जुने विचार आणि दूरदृष्टीच्या अभावामुळे शहरांच्या विकासाचे नियोजन झाले नाही. या सरकारला मेट्रोचा एकही खांब उभारता आला नाही. पुणे मेट्रो प्रकल्पाला २००८ रोजी मान्यता मिळाली, पण भूमिपूजन २०१६ मध्ये झाले. आता ही मेट्रो विस्तारत आहे. राज्यातील ‘महायुती’च्या डबल इंजिन सरकारमुळे प्रकल्पांची गती वाढली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात विकासाला प्राधान्य देणारे सरकार निरंतर सत्तेत असणे आवश्‍यक आहे, अशा शब्दांत काँग्रेसवर टीका करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीला पुन्हा सत्तेत आणण्याचे आवाहन केले.

पुणे हे शहरी विकासाचे केंद्र बनणे गरजेचे आहे. पुण्याची लोकसंख्या वेगाने वाढत आहे. या लोकसंख्येमुळे शहराच्या विकासाची गती कमी न करता उलट सामर्थ्य बनली पाहिजे. शहराचा विस्तार झाला तरी सर्व भाग सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेने जोडले गेले पाहिजेत, याच विचाराने महायुती सरकार दिवसरात्र काम करत आहे. पुण्यात मेट्रो सेवा खूप आधी सुरू होण्याची गरज होती. पण गेल्या काही दशकांत शहरी विकासामध्ये नियोजन आणि दूरदृष्टी नसल्याने प्रकल्पांच्या फाइल मंजूर होत नसत, मंजूर झाली तरी प्रकल्प अनेक वर्षे पूर्ण होत नसे, अशी टीका मोदी यांनी केली.

आमचे सरकार असताना देवेंद्र फडणवीस यांनी ‘ऑरेंज सिटी’ची संकल्पना ठेवली. त्यांनी सिंद्रा औद्योगिकची पायाभरणी ठेवली होती. नॅशनल कॉरिडॉरमार्फत हे काम होणार होते. पण नंतर हे काम थांबले. आता शिंदे यांच्या नेतृत्वात हे काम सुरू होत आहे, असे मोदी यांनी सांगितले.

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवणार -मुख्यमंत्री

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, पुणे ही राज्याची सांस्कृतिक राजधानी आहे. पुण्यात गाड्यांची संख्या वाढली आहे. ती कमी करणे ही राज्य सरकारची जबाबदारी आहे. वाहतूक कोंडीमुळे व्यवस्थेवर ताण येऊन प्रदूषण वाढतय ते कमी करण्यासाठी महायुतीने पुण्यात मेट्रो आणली.

उद्घाटन गुरुवारी २६ सप्टेंबर रोजी होणार होता. मोदी जी संवेदनशील मनाचे आहेत. पण जेव्हा सकाळी चर्चा केली पण पुणेकरांना त्रास होऊ नये या गोष्टी पंतप्रधान यांनी लक्षात घेल्या. संवेदनशील पंतप्रधान कसा असतो हे त्यांनी दाखवलं. उद्घाटन केलं असतं तर म्हणले असते लोकांना त्रास देऊन केलं इकडून पण बोलायचं तिकडून पण बोलायचं. विरोधक बदलापूरमध्ये आरोपीला फाशी द्या फाशी द्या म्हणाल. आरोपी फायर करतो तेव्हा पोलीस शोपिस धरणार का? ते केलं नसतं तर म्हणणार बंदूक शोपीस साठी आहे का? इकडून पण बोलायचं तिकडून पण बोलायचं, दोन्ही बाजूने बोलणाऱ्याना काय म्हणतात? अशी टीका त्यांनी विरोधकांवर केली आहे.

लाडकी बहीण योजना सुरूच राहणार

विरोधक लाडक्या बहिण योजनेत खोडा घालतात. पण माझ्या बहिणी त्यांना जोडे दाखवतील. लाडक्या बहिणींनो तुम्ही निश्चिंत राहा. ही योजना कायम सुरु राहणार आहे. निवडणूक डोळ्यसमोर ठेवून आम्ही ही योजना केलेली नाही, असेही त्यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in