प्रतिनिधी : अतुल जाधव
ठाणे : ठाण्यात उद्धव ठाकरे यांच्या सभेपूर्वी मनसे आणि उबाठा पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्यानंतर ठाण्यातील राजकीय वातावरण अजूनही निवळले नसून याउलट ते आणखी बिघडणार आहे. या घटनेनंतर दोन्ही पक्षातील पदाधिकाऱ्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू केले असून पुन्हा एकदा एकमेकांना आव्हान देण्याचे काम दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे. त्यामुळे ठाण्यातील कायदा-व्यवस्था सुरळीत ठेवण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.
बीड आणि त्यानंतर शनिवारी झालेल्या ठाण्याच्या घटनेनंतर मनसे आणि उबाठा या दोन पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा संघर्ष उफाळून आला आहे. बीडच्या घटनेचे प्रत्युत्तर देण्यासाठी ठाण्यात मनसेच्या कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या गाडीवर शेण, नारळ आणि बांगड्या फेकल्या. तर गडकरी रंगायतनमध्ये दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. मात्र हा राडा आता एवढ्यावर थांबला नसून दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत एकमेकांना पुन्हा आव्हान दिल्याने ठाण्यातील राजकीय वातारण चांगलेच तापले आहे.
मनसे कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवला...
मनसे आणि उबाठा पक्षातील कार्यकर्त्यांच्या राड्यानंतर ठाण्यातील मनसे कार्यालयाबाहेर ठाणे पोलिसांकडून पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. ठाण्यातील विष्णूनगर परिसरात मनसेचे मध्यवर्ती कार्यालय असून या ठिकाणी मनसे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात बसतात. या ठिकाणी पुन्हा कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून हा बंदोबस्त वाढवण्यात आला असल्याची माहिती ठाणे पोलिसांनी दिली आहे.
मनसेचे आंदोलन ही ॲक्शनला रिॲक्शन होती, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनसे आणि उबाठामध्ये झालेल्या राड्यानंतर दिली आहे. राज ठाकरे यांच्या दौऱ्यामध्ये राज ठाकरेंचा ताफा अडवला. त्यावर सुपाऱ्या फेकण्यात आल्या. त्यामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांनी दिलेली ही रिॲक्शन होती. मात्र अशाप्रकारची आंदोलने कोणालाच अपेक्षित नसतात.
- एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
सुपाऱ्यांचे उत्तर नारळाने दिल्यानंतर सुद्धा या माणसाला समजत नाही, असा टोला अविनाश जाधव यांनी उबाठा पक्षाचे खासदार संजय राऊत यांना लगावला आहे. राज ठाकरे यांच्या ताफ्यावर सुपाऱ्या फेकण्याची सुपारी राहुल गांधी आणि सोनिया गांधीची होती का? असा प्रश्न जाधव यांनी उपस्थित केला. तुमचे लोक खाली मार खात होते, तेव्हा वरून खाली उतरण्याची सुद्धा तुमची हिंमत नव्हती. घडलेल्या प्रकरणामध्ये आमचा हात, आमचा पाय, आमचे डोके, आमचे पूर्ण शरीर होते, असेही जाधव म्हणाले. त्यामुळे सर्व महाराष्ट्र सैनिकांचे, महिला सैनिकांचे अभिनंदन, ज्यांनी ज्यांनी यात भाग घेतला. आमच्या साहेबांबद्दल अशा प्रकारे प्रतिक्रिया दिलीत तर उजेडात या, आम्हीही उजेडात येऊ, संजय राऊत यांनी वेळ काय सांगावी. आम्ही त्यावेळेस येऊ, असा इशारा यावेळी अविनाश जाधव यांनी दिला. तर बॅनर फाडण्याचे काम तृतीयपंथी करत असल्याचा टोलाही जाधव यांनी यावेळी लगावला.
- अविनाश जाधव, जिल्हाध्यक्ष, मनसे
या राड्यानंतर उबाठा पक्षाचे माजी खासदार राजन विचारे यांनी मनसेवर गंभीर आरोप केले आहेत. महिलांना पुढे करून हा प्रकार करण्यात आला. बीडला झालेल्या घटनेचे समर्थन आम्हीही करणार नाही. मात्र महिलांना पुढे करून जो प्रकार घडवला तो अतिशय निंदनीय आहे. ठाण्यात याआधी कधीच असे घडले नाही. मर्द असाल तर समोर या, सभागृहातील दीड-दोन हजार पब्लिक खाली आली असती तर आणखी वेगळा प्रकार घडला असता. मनसैनिकांनी त्यांच्या औकातीत राहा, असा इशारा विचारे यांनी दिला आहे.
- राजन विचारे, माजी खासदार, उबाठा
स्टंटबाजी करत असताना त्यांना हे लक्षात नाही आले की नारळ फेकताना जर सर्वसामान्य नागरिकांना हे नारळ लागले असते तर याला जबाबदार कोण असतं? राजकीय विरोध ठीक आहे, मात्र एवढ्या खालच्या थरावर उतरणे हे निंदनीय आहे. ज्यांनी सकाळी बॅनर लावले त्यात नाव नाही गाव होते, फक्त विरोध करायचा म्हणून केला जातो. अशा प्रकारे आंदोलन करणाऱ्यांनी बालिश बुद्धी सुधारावी.
- केदार दिघे, जिल्हाप्रमुख, उबाठा