बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला हिऱ्यांची झळाळी; २७ हजार हिऱ्यांनी सजवलेले पोर्ट्रेट उद्धव ठाकरेंना भेट

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची छबी असलेले २७ हजार हिऱ्यांनी सजवलेले पोर्ट्रेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त ‘मातोश्री’ निवासस्थानी भेट देण्यात आले आहे.
बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला हिऱ्यांची झळाळी; २७ हजार हिऱ्यांनी सजवलेले पोर्ट्रेट उद्धव ठाकरेंना भेट
Published on

मुंबई : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची छबी असलेले २७ हजार हिऱ्यांनी सजवलेले पोर्ट्रेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त ‘मातोश्री’ निवासस्थानी भेट देण्यात आले आहे. शिवसेना प्रवक्ते व जनसंपर्क प्रमुख ॲड. हर्षल प्रधान यांच्या संकल्पनेतून प्रसिद्ध आर्टिस्ट शैलेश आचरेकर यांनी ही कलाकृती साकारली आहे.

हिऱ्यांनी नटलेले बाळासाहेब ठाकरे यांचे हे पोर्ट्रेट अतिशय आकर्षक झाले आहे. शैलेश आचरेकर यांनी यापूर्वी आपल्या अजोड कलेमुळे अनेक पुरस्कार मिळवले आहेत. ख्यातनाम कलावंत म्हणून ते सर्वश्रुत आहेत. २७ हजार हिऱ्यांनी साकारलेले हे पोर्ट्रेट बनवायला त्यांना सहा महिन्यांचा कालावधी लागला. शैलेश आचरेकर यांनी अतिशय बारकाईने यावर काम केले आहे. यापूर्वी त्यांनी असेच रतन टाटा यांचे पोर्ट्रेट तयार केले होते.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंवर शिवसैनिकांचे अपार प्रेम होते. त्यांच्या निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण झालेली पोकळी अद्यापही भरून आलेली नाही. बाळासाहेबांवरील प्रेमापोटी अद्यापही शिवसैनिक आपले सर्वस्व पणाला लावण्यास तयार असतात. या निस्सीम प्रेमातूनच हिऱ्यांच्या झळाळीतील बाळासाहेबांचे पोट्रेट साकारण्यात आले आहे.

बाळासाहेबांच्या स्मारकातील प्रमुख आकर्षण ठरेल - उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे यांना हे पोर्ट्रेट देण्यात आल्यानंतर त्यांनी पाहता क्षणीच ‘अरे वा सुंदर’, अशी प्रतिक्रिया दिली. शैलेश आचरेकर यांनी हिऱ्यांनी साकारलेले बाळासाहेब खरोखर मनमोहक आहेत आणि बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकात नक्कीच ते एक प्रमुख आकर्षण ठरेल, अशी प्रतिक्रिया हे पोर्ट्रेट स्नेहपूर्वक स्वीकारताना उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. याप्रसंगी शिवसेना नेते संजय राऊत, विनायक राऊत, शिवसेना उपनेते नितीन नांदगावकर, हिंगोली-नांदेड संपर्कप्रमुख बबन थोरात, बाळासाहेब आणि आता उद्धव ठाकरेंचे स्वीय सहाय्यक रवी म्हात्रे, आर्टिस्ट शैलेश आचरेकर आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते आणि जनसंपर्कप्रमुख ॲड. हर्षल प्रधान आदी उपस्थित होते.

logo
marathi.freepressjournal.in