
कोरोनाकाळात रेल्वेने ज्येष्ठ नागरिकांची तिकिटांवर मिळणारी सवलत बंद केल्याने देशात मोठा संताप व्यक्त होत आहे. ज्येष्ठांना मिळणारी ही सवलत पुन्हा सुरू करावी, अशी मागणी होत आहे. याबाबत रेल्वेवर दबाव वाढू लागल्यानंतर अटी घालून ही सवलत देण्याचा विचार रेल्वेने चालवल्याचे कळते.
सूत्रांनी सांगितले की, ज्येष्ठ नागरिकांना ही सवलत पुन्हा देण्यासाठी वयाच्या अटींमध्ये मोठा बदल केला जाण्याची शक्यता आहे.
आतापर्यंत ही सुविधा ५८ वर्षांच्या महिला व ६० वर्षांच्या पुरुषांना होती. आता ही सुविधा ७० वर्षांवरील ज्येष्ठांना देण्याचे घाटत आहे. तसेच ही सवलत केवळ सामान्य व शयनयान श्रेणीसाठी मिळण्याची शक्यता आहे. सूत्र म्हणाले की, रेल्वे बोर्ड ज्येष्ठ नागरिकांना सवलत देण्यात वयाच्या अटीत बदल करण्याचा विचार करत आहे.
कोरोनाकाळापूर्वी ६० वर्षांवरील पुरुषांना व ५८ वर्षांवरील महिलांना तिकिटांत सवलत होती. महिलांना ५० टक्के, तर पुरुष व तृतीयपंथीयांना ४० टक्के सवलत होती. आता नव्याने तिकिटांत सवलत देताना ती केवळ विना-वातानुकूलित (नॉनएसी) प्रवासासाठी असेल.
प्रीमियम तत्काळ योजना आणणार
सर्व रेल्वे गाड्यांमध्ये ‘प्रीमियम तत्काळ’ योजना सुरू करण्याचा विचार रेल्वे करत आहे. त्यातून महसूल वाढणार असून, सवलतींचा बोजा सहन करण्यास उपयोग होणार आहे. सध्या ही योजना ८० ट्रेनमध्ये लागू आहे. प्रीमियम तत्काळ भाड्यात प्रवासाचे मूळ भाडे व अतिरिक्त तत्काळ शुल्क समाविष्ट असते. रेल्वे प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या विविध सवलतींमुळे रेल्वेवर दरवर्षी दोन हजार कोटींचा बोजा पडतो.