
विधिमंडळाल्या पावसाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. आज देखील विरोधकांनी विधिमंडळाच्या पायऱ्यावर बसून शिंदे-फडणवीस सरकार विरोधात घोषणाबाजी केल्याचं दिसून आलं. गेल्या काही दिवसात राज्यातून पाच हजार महिला बेपत्ता झाल्या असल्याची माहिती समोर आली होती. यावरून विरोधकांनी विधिमंडळाच्या पायऱ्यावर घोषणाबाजी करत सरकारची निषेध केला आहे.
यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार तसंच काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आमदार उपस्थित होते. यात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार सतेज पाटील, आमदार अशोक चव्हाण, राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड अशा मातब्बर नेत्यांची देखील उपस्थिती होती. यावेळी 'राज्यातल्या महिला झाल्या बेपत्ता, सरकारला नाही पत्ता', अशा घोषणा देण्यात आल्या. दरम्यान, आज विधिमंडळात देखील हा मुद्दा गाजला, राष्ट्रवादीचे आमदार अनिल देशमुख यांनी हे प्रकरणावर आवाज उचलत प्रकरण उचलून धरलं.
राज्यातील महिलांच्या बेपत्ता होण्याच्या मुद्यावर बोलताना अनिल देशमुख म्हणाले की, राज्यात जानेवारी २०२३ ते मे २०२३ या पाच महिन्यांच्या काळात ५ हजार ६१० महिला व मुली बेपत्ता झाल्या आहेत. राज्यात सरासरी ७० महिला दररोज बेपत्ता होत आहेत. अशी धक्कादायक आकडेवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल देशमुख यांनी विधानसभेत सादर केली. यावेळी फक्त मार्च महिन्यात २२०० महिला बेपत्ता झाल्या आहेत. तर पुणे शहरात मुली बेपत्ता होण्याचं प्रमाण सर्वात जास्त असल्याचंही देशमुख म्हणाले.