
भारत जोडो यात्रेच्या (Bharat Jodo Yatra) दुसऱ्या दिवशी कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील (Satej Patil) हे खासदार राहूल गांधी (Rahul Gandhi) यांचे सोबत पदयात्रेत सहभागी झाले. राहूल गांधी यांच्यासोबत चालताना सतेज पाटील यांनी एलईडी स्क्रिन रथ उपक्रमाबद्दल सविस्तर माहिती दिली. भारत जोडो यात्रा कोल्हापूर जिल्ह्याच्या गावागावापर्यंत पोहचविण्याच्या या उपक्रमाचे राहूल गांधी यांनी कौतुक केले.
खासदार राहूल गांधी यांची भारत जोडो यात्रा सोमवारी नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथे महाराष्ट्रात दाखल झाली. यात्रेच्या दुसऱ्या दिवशी सायंकाळच्या सत्रात नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील खतगाव फाटा ते शंकरनगर रामतीर्थ या मार्गामध्ये सतेज पाटील यांनी राहूल गांधींशी चर्चा केली. १३ एलईडी स्क्रिन रथाच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यातील १२३९ गावे आणि कोल्हापूर तसेच इचलकरंजी शहर व १३ नगरपालिका या ठिकाणी १०० दिवस भारत जोडो यात्रा लाईव्ह दाखवण्याचा भारतातील पहिला नाविन्यपूर्ण उपक्रम असल्याची माहिती सतेज पाटील यांनी दिली. या निमित्ताने कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून शेतकरी, महिला, युवक, विद्यार्थी यांच्या पर्यंत भारत जोडो यात्रा पोहचविण्याचा प्रयत्न केला असल्याचे सतेज पाटील यांनी सांगितले. तसेच १०० दिवस हे एलईडी स्क्रिन रथ कशा प्रकारे गावागावात पोहचणार आहेत यांचीही सविस्तर माहिती दिली. या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे खा. राहूल गांधी यांनी कौतुक करत सतेज पाटील यांचेशी हस्तांदोलन केले.