Raj Thackeray : '...हेच पोट्टं त्यांच्यावर वरवंटा फिरवणार' ; राज ठाकरेंचा विरोधकांना इशारा

मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी नागपूरमध्ये एक दिवसाचा दौरा केला यामध्ये त्यांनी मनसे पदाधिकाऱ्यांना कानमंत्र दिला.
Raj Thackeray : '...हेच पोट्टं त्यांच्यावर वरवंटा फिरवणार' ; राज ठाकरेंचा विरोधकांना इशारा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज नागपूरचा एकदिवसीय दौरा केला. यामध्ये त्यांनी मनसे पदाधिकाऱ्यांशी संवाद तर साधलाच, तर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन १५ मिनिटे चर्चादेखील केली. पदाधिकाऱ्यांशी सवांद साधताना ते म्हणाले की, "विदर्भ हा पहिले काँग्रेसचा आणि आता भाजपचा बालेकिल्ला आहे. सत्तांतर हे होत राहतं. नवे येतात आणि जुने जातात. विरोधक नेहमी म्हणतात, 'हे पोट्टं कुठे काय करणार?' यावरून तुम्ही खचून जाऊ नका, कारण हेच पोट्टं वरवंटा फिरवणार आहे." असा इशारा त्यांनी यावेळी विरोधकांना दिला.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले की, "आज नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती पत्र देण्यासाठी नागपुरात आलो. काही महिन्यांपूर्वी मी जेव्हा नागपुरात आलो होतो, तेव्हा मी परत गेल्यावर मनसेला पदाधिकारी नेमणूक करण्यासाठी माणसे मिळत नाही, अशी टीका करण्यात आली. मात्र आजचे चित्र तशी टीका करणाऱ्यांच्या डोळ्यात अंजन घालणारे आहे. काँग्रेसच्या लोकांनी खूप संघर्ष केले. बाळासाहेब ठाकरे यांनीही अनेक वर्ष संघर्ष केले. १९६६ला शिवसेना स्थापन झाली, मात्र सत्ता १९९५मध्ये आली. सर्वांना सर्व काही लवकर हवे आहे, सध्या हेच चित्र राजकारणात दिसते आहे. मात्र त्यासाठी जीवाचे रान करावे लागते."

नागपूरमध्ये आल्यानंतर राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीदेखील भेट घेतली. मात्र, त्याच्यामध्ये काय चर्चा झाली? याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पण, मागच्या काही दिवसांमध्ये राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये अनेकदा भेट झाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राज आठाकरेंनी त्यांची भेट घेतल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in