रविकांत तुपकरांची बैठक 'मराठा आंदोलकांनी उधळली
लातूर : आरक्षणाच्या आक्रमक झालेल्या मराठा समाजाने पुढाऱ्यांना भावबंदी केलेली असल्याने अनेक नेत्यांना जनतेचा रोष पत्करावा लागत आहे. लोक नेत्यांना अडवून जाब विचारू लागले आहेत. गेल्या दोन दिवसांत अंबादास दानवे, प्रताप पाटील-चिखलीकर, रोहित पवार, हसन मुश्रीफ, अजित पवार या नेत्यांना मराठा आंदोलकांच्या रोषाला सामोरे जावे लागले असताना शनिवारी लातूरमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर यांची बैठक सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी उधळून लावली.
रविकांत तुपकर यांनी लातूरच्या औसा रस्त्यावरील विश्रामगृहात शनिवारी बैठक आयोजित केली होती. त्यासाठी आलेले रविकांत तुपकर विश्रामगृहातील एका सोफ्यावर बसले होते. मराठा आंदोलकांनी त्यांना घेरत जोरदार घोषणाबाजी सुरू केली. ‘रविकांत तुपकर चले जाव’, ‘रविकांत तुपकर परत जा, परत जा’ अशा घोषणा आंदोलक देत होते. तुपकर यांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र कोणीही त्यांचे ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. आंदोलक तुपकर यांच्यासमोर जोरजोरात घोषणा देत राहिले. अखेर रविकांत तुपकर यांनी सोफ्यावरून उठत बैठक रद्द केली आणि ते माघारी फिरले.
साताऱ्याचे पालक मंत्री शंभूराज देसाई यांनाही शनिवारी साताऱ्यात मराठा आंदोलकांच्या रोषाचा सामना करावा लागला. प्रश्नांची सरबत्ती करत मराठा आंदोलकांनी शंभूराज देसाईंना घेराव घातला. आजपर्यंत सरकारने फक्त आश्वासनांचा पाऊस पाडला, पण काम एक रुपयाचं केलेलं नाही, आरक्षण कधी देणार? एवढंच सांगा, असा सवाल करत मराठा आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेतली.