
गिरीश चित्रे / मुंबई
केंद्र सरकारच्या एसआरएसच्या अहवालानुसार राज्यातील अर्भक मृत्युदर हा २००८ मध्ये प्रति एक हजार जिवंत जन्मामागे ३३ असा होता. त्यात घट होत तो आता १६ वर आला आहे. तसेच सन २०२० च्या एसआरएस अहवालानुसार, राज्याचा नवजात शिशु मृत्युदर हा २००८ मध्ये प्रति एक हजार जिवंत जन्मामागे २४ असा होता, त्यात घट होऊन तो ११ वर आला आहे. तसेच ५ वर्षाखालील बालमृत्यूचा दर प्रति एक हजार जिवंत जन्मामागे ४१ वरून १८ पर्यंत खाली आला आहे. त्यामुळे राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने राबवलेल्या उपाययोजनांमुळे अर्भक, शिशू व ५ वर्षांखालील बालमृत्यू रोखण्यात राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाला यश मिळाल्याने सर्वंच स्तरातून कौतुक केले जात आहे.
राज्यातील अर्भक व नवजात शिशू मृत्युदर कमी करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत प्रयत्न करण्यात येत आहेत. केंद्र सरकारच्या अहवालावरून हे स्पष्ट झाले आहे. केंद्र सरकारच्या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती पुढे आली आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने प्रजनन व बाल आरोग्य कार्यक्रमांतर्गत अर्भक व बालकांचे आजार व मृत्यू टाळण्यासाठी व बालकांचे आरोग्य सुधारण्यासाठी विविध योजना राबविल्या जातात. या सर्व योजनांची अंमलबजावणी राज्य व जिल्हास्तरावरून करण्यात येते, असे राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
२.५ लाखांहून अधिक बालकांना जीवनदान!
राज्यात २०२० ते ऑक्टोबर २०२४ या कालावधीत एकूण २,७३,१०० बालकांना एसएनएसीयू मध्ये उपचारासाठी दाखला करण्यात आले. त्यापैकी २,२२,३७८ बालकांवर योग्य उपचार केल्याने ठणठणीत बरे होऊन घरी सोडण्यात आले.
राज्यात ७५ लाखांहून अधिक घरांना भेटी!
राज्यातील बाल मृत्युदर कमी करण्यासाठी आणि बालकांची पोषण स्थिती सुधारण्यासाठी तसेच शारीरिक वाढ आणि विकास होण्यासाठी ‘घरच्या घरी बालकांची काळजी’ हा महत्त्वाचा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमांतर्गत आशा व एएनएममार्फत त्रैमासिक गृहभेटी देण्यात येतात. ज्यामध्ये बालकांना वयाच्या
३ ऱ्या महिन्यापासून ते १५ महिन्यापर्यंत (३ रा, ६ वा, ९ वा, १२ वा आणि १५ वा महिना) अशा ५ विशेष गृह भेटी देण्यात येतात. ज्यामध्ये पोषण, आरोग्य, बालकांचा विकास आणि स्वच्छता या महत्त्वाच्या बाबींवर भर देण्यात येतो. राज्यातील ३४ जिल्ह्यांमध्ये हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत सन २०२२-२३ मध्ये एकूण ४१,२८,३६९ गृहभेटी तसेच २०२३-२४ मध्ये ३३,७५,२९४ गृहभेटी अशा प्रकारे ३ ते १५ महिने वयोगटातील बालकांना देण्यात आलेल्या आहेत.
नवजात बालकांच्या उपचारासाठी विशेष कक्ष!
राज्यातील १८ सामान्य रुग्णालये, १२ स्त्री रुग्णालये व १५ उपजिल्हा रुग्णालये व ३ सामान्य रुग्णालय, १ ग्रामीण रुग्णालय व ५ म.न.पा. रुग्णालये येथे गंभीर आजारी नवजात बालकाच्या उपचारासाठी विशेष कक्ष (एसएनसीयू) कार्यान्वित करण्यात आले आहेत. राज्यात एकूण ५५ एसएनसीयूमध्ये १,२०१ खाटा कार्यान्वित आहेत.
ऑक्टोबर २०२४ पर्यंत २२ लाख घरांना भेट!
तसेच सन २०२४-२५ (ऑक्टोबर २०२४ अखेर) मध्ये २२,४६,३३४ गृहभेटी ३ ते १५ महिने वयोगटातील बालकांना देण्यात आलेल्या आहेत.
स्तनदा व गोरदर मातांचे समुपदेशन!
सन २०२० ते ऑक्टोबर २०२४ या कालावधीत एकूण ७१,०५,३१३ माता बैठका झाल्या असून, यामध्ये ३,५६,७३,४७६ स्तनदा आणि गरोदर मातांना समुपदेशन देण्यात आले.