जात, धर्म काही असला तरी शेवटी आपण भारतीय! शरद पवार यांचे आरक्षण आंदोलनावर मत
पुणे : आरक्षणाविषयीच्या प्रश्नाशी संबंधित घटकांनी सामंजस्याची भूमिका घेण्याची गरज आहे. जात, धर्म काही असला तरी शेवटी आपण भारतीय आहोत. सरकारनेदेखील आरक्षणाबाबत विलंब लावू नये. लोकांना विश्वासात घेऊन पूर्तता करावी, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आरक्षणाविषयी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
“आरक्षणामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे, मात्र तणाव होण्याचे कारण नाही. शेवटी आपण सगळे जात, धर्म काही असला तरी भारतीय आहोत. महाराष्ट्राचे घटक आहोत. आपल्या सगळ्यांमध्ये सामंजस्य कसे राखता येईल, याबाबतची भूमिका या क्षेत्रात नेतृत्व करतात त्यांनी घेतली पाहिजे. याचसोबत राज्य सरकारनेदेखील या प्रश्नांना विलंब लावू नये, लोकांना विश्वासात घ्या आणि त्याची पूर्तता करून वातावरण चांगले कसे राहील याची काळजी घ्यावी,” असा सल्ला शरद पवारांनी सरकारला दिला आहे.
आतिशी चांगले काम करतील
अरविंद केजरीवाल चांगले काम करत होते. अरविंद केजरीवाल यांना एका विशिष्ट स्थितीत कॉर्नर करण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकले गेले. यानंतर अरविंद केजरीवाल यांनी राजीनामा दिला. मुख्यमंत्री म्हणून ज्यांची निवड करण्यात आली, त्यांचे काम आम्ही दिल्लीत पाहिले आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून यापूर्वी दोन महिला नेत्यांनी नेतृत्व केले होते. त्याचप्रकारे आतिशीदेखील चांगले काम करतील आणि दिल्लीच्या प्रशासनाचा दर्जा वाढवण्यासाठी प्रयत्न करतील, असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला.
पुढील दहा दिवसांत जागावाटपाला अंतिम रूप
महाविकास आघाडीमधील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट हे तिन्ही पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढणार आहेत. त्यामुळे एखादी जागा तीनपैकी कोणत्या पक्षाने लढवावी, यावर विचार सुरू आहे. ती प्रक्रिया सध्या सुरू आहे. गेल्या तीन दिवसांपासून तिन्ही पक्षांचे नेते मुंबईत आहेत. जागावाटपाचा निर्णय झाल्यावर प्रत्येक पक्ष कोणता उमेदवार द्यायचा यावर विचार करेल. पुढच्या १० दिवसांत जागावाटपाचा मुद्दा अंतिम झालेला असेल, त्यानंतर जनतेमध्ये जाऊन प्रचाराला सुरुवात केली जाईल,” असेही शरद पवार यांनी सांगितले.