ओबीसींच्या आरक्षणाला कोणताही धक्का नाही; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन

राज्यात मराठा समाजाला आरक्षण देतानाच आपण ओबीसींच्या आरक्षणाला कोणताही धक्का लागू देणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लक्ष्मण हाके यांना दिले.
एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे संग्रहित फोटो

जालना : राज्यात मराठा समाजाला आरक्षण देतानाच आपण ओबीसींच्या आरक्षणाला कोणताही धक्का लागू देणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लक्ष्मण हाके यांना दिले. तसेच शुक्रवारी दोन मंत्र्यांचे शिष्टमंडळ हाके यांच्या भेटीसाठी पाठवण्यात येणार आहे.

गेल्या सहा दिवसांपासून लक्ष्मण हाके हे उपोषणाला बसले असून त्यांच्या भेटीला राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार गेले असता मुख्यमंत्र्यांनी त्यांना हे आश्वासन दिले.

ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का लागू नये या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील वडीगोद्री येथे गेल्या सहा दिवसांपासून लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे हे उपोषण करत आहेत. त्यांच्या भेटीला राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार गेले होते त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांना फोन लावून त्या ठिकाणच्या परिस्थितीची जाणीव करून दिली. हाके यांनी तब्येतीची काळजी घ्यावी, ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का लागणार नाही याची आपण काळजी घेतली आहे, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.

उपोषणकर्ते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांना वडेट्टीवार यांनी पाणी पिण्याचा आग्रह केला. त्यानंतर दोन्ही आंदोलकांनी पाणी घेतले.

लक्ष्मण हाकेंच्या भेटीला गेलेले विजय वडेट्टीवार यावेळी काहीसे भावुक झाल्याचे दिसून आलं. ते म्हणाले की, ओबीसींच्या मागे उभे राहणे हे माझे कर्तव्य आणि जबाबदारी आहे. सत्ता येते आणि जाते, पदाचा मी कधीच विचार केला नाही. या पुरोगामित्वाला धक्का लावण्याचे काम २०१४ मध्ये सुरू झाले.

नांदेडमध्ये चक्काजाम

ओबीसी आंदोलकांनी नांदेड-लातूर महामार्ग ठिय्या आंदोलन करून चक्का जाम केला आहे. सरकारने प्रा. लक्ष्मण हाके यांच्या मागण्या त्वरित मंजूर कराव्यात, अशी मागणी ओबीसी कार्यकर्त्यांनी केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in