
मुंबई पोलिसांत मनुष्यबळाची तीव्र टंचाई असल्याने गृह खात्याने तीन हजार कंत्राटी पोलिसांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सुरक्षा महामंडळामार्फत कंत्राटी पद्धतीने जास्तीत जास्त ११ महिन्यांसाठी कंत्राटी पोलिसांची भरती करण्यात येणार आहे. मात्र, गृहखात्याच्या या निर्णयाविरोधात राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी संताप व्यक्त केला.
याबाबत बोलताना रोहित पवार म्हणाले की, "राजकारण पक्ष आणि नेते फोडाफोडीची नवीन प्रथा सुरु करुन महाराष्ट्राचं शालीन राजकारण भाजपाने मलीन केलं. आता त्याचं प्रमाणे कंत्राटी पोलिसांची भरती करुन आधीच बिघडलेल्या कायदा व सुव्यवस्थेची पूर्ण वाट लावण्याचा तर हा डाव नाही ना? अशी शंका येते. लाखो युवा पोलिस भरतीसाठी प्रयत्न करत असताना त्याकडं दुर्लक्ष करुन कंत्राटी भरती करणाऱ्या राज्य शासनाचा तीव्र निषेध", असं ट्विट रोहीत पवार यांनीी केलं आहे.
पोलीस दलात मनुष्यबळाची तीव्र टंचाई असून राजकीय त्यांच्या संरक्षणामुळे आणखी मनुष्यबळाची गरज आहे. दहीहंडी, गणेशशोत्सव, नवरात्र, रमजान, दिवाळी अशा सणासुदीच्या काळात बंदोबस्तासाठी अतिरिक्त पोलिसांची गरज भासते. त्यामुळे कंत्राटी पोलील भरती करण्याचा पोलीस आयुक्तांचा आग्रह होता, असं गृह खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं. राज्य सरकारने २१ जानेवारी २०२१ रोजी ७,०७६ शिपाई आणि ९९४ वाहन चालकांच्या भरतीला मंजुरी दिली आहे. ही भरती प्रक्रिया आणि शिपायांचं प्रशिक्षण पूर्ण व्हायला दोन वर्षांचा काळ लागणा आहे. तो पर्यंत ही ११ महिन्यासाठी कंत्राटी पोलिसांची भरती केली जाणार आहे.