कोल्हापूर : कागल विधानसभा मतदारसंघात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे निष्ठावान कोल्हापूर ग्रामीण भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत 'राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार' पक्षात प्रवेश करत तुतारी हाती घेतली.
कागल येथील गैबी चौकात जनसमुदायाच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी राष्ट्रवादीचे नेते शरदचंद्र पवार प्रमुख पाहुणे उपस्थित होते.
यावेळी शरद पवार म्हणाले की, कागलमध्ये परिवर्तन करण्याचा जो निर्णय समरजितसिंह यांनी घेतला आहे त्या निर्णयाच्या पाठीशी कागलच्या सर्व स्तरातील जनता ठामपणे उभी आहे याची प्रचिती येते.
समरजितसिंह घाटगे म्हणाले, "आपल्यासमोर मोठी ताकद आहे. त्यांच्याकडे वीस-पंचवीस वर्षे सत्ता आहे. मंत्रिपद आहे. राज्य सरकारची ताकद आहे. केंद्रातील मोदी सरकारची ताकद त्यांच्या बाजूने आहे. जिल्ह्यातील जिल्हा बँक गोकुळ यासारख्या मोठ्या संस्था त्यांच्याकडे आहेत. माझ्याकडे काय आहे, असा प्रश्न लोक मला विचारतात. मी उत्तर देतो, माझ्याकडे शरदचंद्र पवार आहेत. मला आणखी कोणाचीही गरज नाही. त्यांच्या ताकदीवर कागलमध्ये स्वराज्य स्थापन करण्याचे कार्य पूर्ण करणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.