...तर वीर सावरकरांना 'भारतरत्न' देऊन दाखवा; अजित पवारांचा हल्लाबोल
आज महाविकास आघाडीने छत्रपती संभाजीनगरमध्ये 'वज्रमूठ' सभा घेतली. यावेळी राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाजपसह शिंदे गटावर जोरदार टीका केली. भाजपने काढलेल्या 'सावरकर गौरव यात्रे'वर बोलताना ते म्हणाले की, "जर एवढाच तुम्ही स्वातंत्र्यवीर सावरकरांचा आदर करत असाल आणि हिमंत असेल तर स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देऊन दाखवा." असा इशारा त्यांनी यावेळी दिला. पुढे ते म्हणाले की, "फक्त महागाई, बेरोजगारीवरून दुसरीकडे लक्ष जाण्यासाठी हे सुरु आहे. छ. संभाजीनगरमध्ये हिंसक घटना घडण्याचे कारण काय? मविआची सभा होऊ नये म्हणून? ही कुठली लोकशाही?" असादेखील प्रश्न त्यांनी केला.
विरोधी पक्षनेते अजित पवार यावेळी म्हणाले की, "काहीजण फक्त वातावरण खराब करून महत्त्वाच्या प्रश्नांवरून लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहेत. आज उद्योगपती राज्यात गुंतवणूक करायला तयार नाहीत. राज्यातले वातावरण चांगले नाहीत, तर कोणीही इथे गुंतवणूक करायला येणार नाही" असा टोला त्यांनी यावेळी लगावला. तसेच, "मुख्यमंत्र्यांनी मराठवाडा स्वातंत्र्यसैनिकांबाबत बोलायला किती वेळ दिला? फक्त १३ मिनिटे? एवढी उपेक्षा मराठवाडा स्वातंत्र्यसेनानींसाठी इतर कोणत्याच मुख्यमंत्र्यांनी केली नाही, तेवढी या मुख्यमंत्र्यांनी केली." अशी टीका त्यांनी केली.