
मुंबई महापालिकेच्या निवडणुका कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकतात. ही निवडणूक जिंकण्यासाठी सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. मुंबई महापालिकेवर झेंडा फडकवण्यासाठी भाजपने सभा, बैठकांच्या माध्यमातून जनसंपर्क वाढवण्यास सुरुवात केली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांचे नेते एकमेकांवर चिखलफेक करताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ठाकरे गटावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. 23 जानेवारीला कोरोना काळातील सर्वात मोठा घोटाळा उघड होईल, असे संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे.
काय म्हणाले संदीप देशपांडे ?
एक व्यक्ती शाखेत आली, त्या व्यक्तीने काही कागदपत्रे आणि एक पेनड्राइव्ह शाखेत दिले. सदर व्यक्तीचे नाव समजू शकले नाही. पण मी तो पेनड्राइव्ह पाहिला, कागदपत्रे पाहिली. विरप्पन टोळीने कोरोनाच्या काळात मुंबई कशा पद्धतीने लुटली होती. या दरोड्याचा पुरावा या पेन ड्राईव्हमध्ये आहे. सोमवार, 23 जानेवारीला आम्ही हे सर्व माध्यमांसमोर मांडणार आहोत. आम्ही पोलिसांकडे तक्रारही करणार आहोत,” असे संदीप देशपांडे यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना सांगितले.
दरम्यान, भाजपनेही मुंबई पालिकेच्या कारभारावर आक्षेप घेत ठाकरे गटावर गंभीर आरोप केले आहेत. ठाकरे गटाच्या नेत्यांनी कोरोनाच्या काळात मोठे आर्थिक घोटाळे केल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. त्याचवेळी 23 जानेवारी रोजी संदीप देशपांडे कोणता घोटाळा पुढे आणतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.