
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना बुधवारी आर्थर रोड जेलमध्ये ईडी कोठडीत असणारे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना भेटण्याची परवानगी नाकारली आहे. पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) संजय राऊत यांना १ ऑगस्ट रोजी अटक केली असून ते सध्या १९ सप्टेंबरपर्यंत कोठडीमध्ये असणार आहेत.
“संजय राऊत यांना भेटायचे असेल, तर उद्धव ठाकरे यांनी न्यायालयाची रितसर परवानगी घ्यावी,” असे कारण तुरुंग प्रशासनाने दिले आहे. सर्वसामान्य कैद्यांना ज्या पद्धतीने भेटायची व्यवस्था असते, तशाच पद्धतीने उद्धव यांना राऊतांना भेटता येईल. उद्धव ठाकरेंनी राऊत यांना जेलरच्या रूममध्ये भेटण्यासंदर्भात परवानगी मागितली होती. मात्र अशी विशेष परवानगी देता येणार नाही. इतर सर्वसामान्य कैद्यांप्रमाणेच ठाकरेंना राऊत यांना भेटता येईल, असेही तुरुंग प्रशासनाकडून कळवण्यात आले आहे.
भेटीसंदर्भात उद्धव यांनी कोणतेही लेखी निवेदन तुरुंग प्रशासनाला दिले नव्हते तर उद्धव यांच्या जवळच्या व्यक्तीने तुरुंग प्रशासनाकडे फोन करून उद्धव यांना राऊतांना पोलीस अधीक्षकांच्या रूममध्ये भेटायचे आहे, असे सांगितले होते. त्यावर अशाप्रकारे भेट देता येणार नाही. रितसर पद्धतीने परवानगी घेऊनच भेट घेता येईल, असे तुरुंग अधीक्षकांनी म्हटले.
तुरुंगातील मॅन्यूअलप्रमाणे केवळ रक्ताचे नाते असणाऱ्या व्यक्तींनाच कैद्याला तुरुंग प्रशासनाच्या परवानगीनंतर भेटता येते. इतर कुणालाही एखाद्या कैद्याला भेटायचे असेल तर त्यासाठी न्यायालयाची परवानगी घ्यावी लागते. आता उद्धव ठाकरे हे राऊत यांची भेट घेण्यासाठी कोर्टात परवानगी मागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.