
गुवाहटी येथे रॅडीसन ब्ल्यु हॉटेलमध्ये नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे बंडखोर आमदार गेल्या पाच दिवसांपासून ठिय्या मांडून थांबले असल्याने व त्यांनी थेट शिवसेनेला व पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनाच आव्हान दिल्याने राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार अल्पमतात आले आहे. त्यामुळे सर्वांच्या नजरा बंडखोरांच्या पुढील हालचालींकडे लागलेल्या असतानाच सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील कट्टर शिवसैनिक व सातारा जिल्हा उपप्रमुख संजय भोसले हे शुक्रवारी गुवाहाटीत पोहोचत त्यांनी हॉटेलबाहेर शिवसेना जिंदाबाद, एकनाथ शिंदे साहेब तुम्ही परत चला, अशा आशयाचे बोर्ड लावून आंदोलन केल्याने सातारा जिल्ह्यासह शिवसेनेच्या व बंडखोरांच्या गोटातही खळबळ उडाली आहे. दरम्यान,आसाम पोलीसांच्या कडक बंदोबस्तातही संजय भासले हॉटेल बाहेर पोहोचलेच कसे या चिंतेने खडबडून जागे झालेल्या आसाम पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.
सेनेचे सातारा जिल्हा उपप्रमुख पदावरती कार्यरत असलेले व माण तालुक्यातील संजय भोसले हे कडवट आणि निष्ठावंत शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख आहे. जेव्हा सेना सत्तेत नव्हती, त्यावेळी माण तालुक्यातील कोणतीही बड़ी आसामी शिवसेनेत नव्हती, तेव्हापासून सर्वसामान्यांसाठी शिवसेनचे आंदोलन म्हणून संजय भोसले हे आंदोलने करुन गोरगरीबांना न्याय मिळवून देण्याचे काम करत असत. त्यातच शिवसेनेतील सध्या सुरू असलेल्या बंडखोरांच्या राजकीय नाट्यामुळे व्यतिथ झालेल्या संजय भोसले यांनी थेट गुवाहाटी गाठली.