सत्यपाल मलिक यांची सीबीआय चौकशी होणार आरएसएस आणि अंबानींवर ३०० कोटींची लाच दिल्याचा आरोप

सत्यपाल मलिक यांची सीबीआय चौकशी होणार 

आरएसएस आणि अंबानींवर ३०० कोटींची लाच दिल्याचा आरोप

जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी काही दिवसांपूर्वी अंबानी यांच्याशी संबंधित फाइल्स क्लीअर करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांनी आपल्याला ३०० कोटी रुपयांची लाच देण्याचे आमिष दाखवले होते, असा दावा केला होता. या संपूर्ण प्रकरणाचा निष्पक्ष तपास करण्यासाठी खुद्द जम्मू-काश्मीर प्रशासनाने सीबीआयमार्फत या प्रकरणाची चौकशी करण्याची शिफारस केली आहे.

राजस्थानमध्ये आयोजित एका कार्यक्रमात मलिक यांनी हे दावे केले होते. “काश्मीरला गेल्यानंतर माझ्याकडे दोन फाइल्स आल्या. एक फाईल अंबानींची होती आणि दुसरी आरएसएसशी संलग्न व्यक्तींची होती, जे आधीच्या मेहबुबा मुफ्ती-भाजप युती सरकारमध्ये मंत्री होते. ते पंतप्रधान मोदींच्याही जवळचे होते. मला सचिवांनी माहिती दिली की, यात घोटाळा झाला आहे आणि त्यानंतर या दोन फायलींशी संबंधित व्यवहार रद्द करण्यात आला. दोन्ही फायलींसाठी १५०-१५० कोटी रुपये दिले जातील, असे सचिवांनी सांगितले; पण मी त्यांना सांगितले की, मी पाच कुर्ता-पायजमा घेऊन आलो आहे आणि तेच घेऊन निघणार आहे,” असे मलिक म्हणाले होते.

सत्यपाल मलिक हे सध्या मेघालयाचे राज्यपाल आहेत; मात्र घटनात्मक पद भूषवत असतानाही ते अनेकदा राजकीय विषयांवर खुलेपणाने बोलले आहेत. शेतकरी आंदोलनादरम्यान त्यांनी सरकारला घेरले होते. सत्यपाल मलिक यांनी अनेक वेळा कृषी कायद्यांवरून सरकारवर टीका केली आहे. “मी दोन्ही फायलींबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटायला गेलो होतो. मी त्यांना सांगितले की, या फाइल्समध्ये घोटाळा आहे, हे लोक त्यात गुंतलेले आहेत. ते तुमचे नाव घेत आहेत. तुम्हीच सांगा काय करू. मी त्यांना सांगितले की, मी फाईल पास करणार नाही. ते पूर्ण करायचे असेल तर मी पद सोडतो, दुसऱ्याकडून करून घ्या. भ्रष्टाचारावर तडजोड करण्याची गरज नाही, असे खुद्द पंतप्रधानांनीच सांगितल्याने मी त्यांचे कौतुक करेन,” असेही मलिक यांनी कार्यक्रमात म्हटले होते.

चौकट

जम्मू-काश्मीर हे देशातील सर्वात भ्रष्ट राज्य - मलिक

सत्यपाल मलिक यांनी यापूर्वीही जम्मू-काश्मीरबाबत अनेक दावे केले आहेत. जम्मू-काश्मीर हे देशातील सर्वात भ्रष्ट राज्यांपैकी एक आहे. “संपूर्ण देशात चार ते पाच टक्के कमिशनची मागणी केली जाते; मात्र काश्मीरमध्ये १५ टक्के कमिशन मागितले जाते. माझ्या काळात काश्मीरमध्ये भ्रष्टाचाराचे एकही मोठे प्रकरण समोर आले नाही. मी गरीब माणूस असल्याने देशातील कोणत्याही ताकदवान माणसाशी लढू शकतो. माझ्याकडे निवृत्तीनंतर राहायला घर नाही. त्यामुळे काळजी करण्यासारखे काही नाही,” असेही सत्यपाल मलिक म्हणाले होते.

Related Stories

No stories found.