रामदास कदमांना वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये पाठवा - भास्कर जाधव

मुंबईतील शौचालयांमध्ये जेवढी घाण नाही, तेवढी घाण रामदास कदम यांनी ओकली आहे
File photo
File photoANI

बंडखोरीनंतर शिंदे गट आणि शिवसेना नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या जौरदार फैरी झोडल्या जात आहेत. त्यातच आता शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी केलेल्या टीकेनंतर शिवसेना नेते भास्कर जाधव यांची जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. रामदास कदमांना वेड्याच्या रुग्णालयात दाखल करायला हवे, अशी टीका भास्कर जाधव यांनी केली आहे.

“मुंबईतील शौचालयांमध्ये जेवढी घाण नाही, तेवढी घाण रामदास कदम यांनी ओकली आहे. माझे वडील गेल्यानंतर अनेक नेते मला भेटायला आले. अनंत गीते, सुनील तटकरे, हसन मुश्रीफ आले, त्यांच्या मी पाया पडलो. रामदास कदम यांच्याही पाया पडलो. त्याचा अर्थ त्यांनी वेगळा काढला. त्यांना काही वैचारिक पातळी आहे की नाही?” असा सवालही जाधव यांनी उपस्थित केला आहे. रामदास कदम यांच्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिमा मलीन होत आहे. त्यामुळे शिंदे यांनी कदमांना तत्काळ पदावरून हटवले पाहिजे, अशी मागणी जाधव यांनी केली आहे.

दापोलीत आयोजित एका सभेत रामदास कदम यांनी ठाकरे कुटुंबावर वैयक्तिक पातळीवर टीका केली होती. “बाळासाहेबांना वाटत असेल की, सोनियांच्या नादी लागून आपला मुलगा बिघडला. उद्धव ठाकरे हेच खरे गद्दार आहेत. उद्धव ठाकरेंना आपण बाळासाहेबांचा मुलगा असल्याचा संशय आहे की काय,” अशा शब्दांत रामदास कदम यांनी टीका केली आहे.

“उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना ते कुठेही गेले तरी रश्मी वहिनी त्यांच्यासोबत असायच्या. माँसाहेब मीनाताई ठाकरे या आयुष्यात कधीही व्यासपीठावर चढल्या नाहीत. तर उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना केवळ तीन वेळा मंत्रालयात गेले होते. आदित्य ठाकरे यांच्यापेक्षा भरत गोगावले यांना मंत्रिपद दिले असते; पण वडील मुख्यमंत्री झाल्यावर आदित्य ठाकरे यांना लगेच कॅबिनेटमंत्री व्हायचे होते. एवढेच कशाला, तर रश्मी ठाकरे यांचाही मंत्रिमंडळात कसा समावेश झाला नाही, याचे मला आश्चर्य वाटते,” अशी खोचक टीका रामदास कदम यांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in